पंतप्रधान मोदी १ ऑक्टोबरला करणार  फाईव्ह जीची घोषणा

भारतात फाईव्ह जी सेवा सुरु होण्याची वेळ आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १ ऑक्टोबर रोजी ही सेवा रोलआउट होत असल्याची घोषणा करणार असल्याचे समजते. अपकमिंग इंडिया मोबाईल कॉंग्रेस इव्हेंट मध्ये मोदी ही घोषणा करतील त्याचबरोबर सिक्स जी सेवेसंदर्भातली योजना जाहीर करतील असे सांगितले जात आहे. हा कार्यक्रम चार दिवसाचा असला तरी पहिल्याच दिवशी फाईव्ह जी रोल आऊट घोषणा केली जाणार आहे.

यापूर्वीच रिलायंस जिओ आणि एअरटेल यांनी दिवाळी पासून फाईव्ह जी सेवा सुरु केली जाईल अशी घोषणा केली होती. या दोन्ही कंपन्या सुरवातीला दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या चार महानगरात ही सेवा देणार आहेत आणि डिसेंबर २०२३ पर्यत त्याचा विस्तार देशभर केला जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फाईव्ह जी सेवेचे दर किती असतील याचा खुलासा केलेला नाही मात्र हे दर सर्वसामान्य लोकांना परवडणारे असतील असे सूचित केले आहे.

सध्या देशात ४ जी साठी ५०० ते ६०० रुपये रिचार्ज दर आहेत. एअरटेलने त्यांच्या ४ जी ग्राहकांना फाईव्ह जी साठी नवे सिम घेण्याची गरज नसल्याचा खुलासा पूर्वीच केला आहे. ग्राहकांच्या ४ जी सिमवरच लेटेस्ट नेटवर्क सपोर्ट युजर्सना मिळणार आहे.