का वाढतेय हुबहू दिसणाऱ्या लोकांची संख्या?

बॉलीवूड किंवा अन्य क्षेत्रातले सेलेब्रिटी, प्रसिद्ध राजकीय नेते यांच्या हूबहु म्हणजे डुप्लीकेटचे फोटो बरेच वेळा इंटरनेट वर झळकताना दिसतात. जुळ्यांचे फोटो हे फारसे नाविन्य नसले तरी जगाच्या कुठल्या तरी दोन भागात एकमेकांशी काहीही सबंध नसलेले, वेगळ्या वयाचे, जाती पंथाचे, एकमेकांना पूर्ण अपरिचित असे दोन लोक दिसायला एकसारखे असतात याचे नक्कीच कुतूहल असते. अमेरिकी बॉडी बिल्डर जोन एफरने त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आणि त्याच्यात आणि  आपला बॉलीवूड स्टार अनिल कपूर यांच्यात किती साम्य आहे याची जोरदार चर्चा सुरु झाली.  अर्थात अनिल कपूर आणि जोन यांच्यात ४० वर्षाचे अंतर आहे.

एकाच आईबापाच्या पोटी एकाचवेळी जन्म घेणाऱ्या मुलांना जुळे म्हणतात पण दोन वेगळे देश, वेगळे वंश आणि एकमेकांना अपरिचित अश्या दोन व्यक्ती जेव्हा एकसारख्या दिसतात त्यांना डॉपलगँगर म्हटले जाते. विशेष म्हणजे अनेकदा या दोन व्यक्तींचे डीएनए बऱ्याच प्रमाणात सारखे असतात.

कॅनडाच्या फ्रांस्वा बृनोले याने अश्या डॉपलगँगरचे फोटो कुतूहलातून प्रसिध्द केले आणि मग या चमत्कारामागचे कारण शोधण्यासाठी संशोधक कामाला लागले. अश्या १६ डॉपलगँगरवर संशोधकांनी अध्ययन केले तेव्हा मनोरंजक बाबी समोर आल्या. वास्तविक कुठल्याच दोन व्यक्तींचे डीएनए सारखे नसतात असे मानले जाते. पण या नव्या संशोधनातून त्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले. कारण या एकसारख्या दिसणाऱ्या पण परस्परांना पूर्ण अपरिचित असणाऱ्या व्यक्तींचे बहुतेक डीएनए एकसारखे होते.

यामागची अनेक कारणे दिली जात आहेत. काही जणांच्या मते आता विविध जाती, धर्म वंश यांच्यात विवाह होतात. त्यामुळे अश्या विवाहातून जन्माला येणाऱ्या बालकांच्या मध्ये पूर्वजांचे डीएनए येऊ शकतात. यामुळे भविष्यात एकसारखी माणसे जन्माला येण्याचे प्रमाण वाढलेले असू शकते. काही जणांच्या मते आजकाल आयव्हीएफ किंवा स्पर्म डोनेशन मधून सुद्धा अनेक बाळे जन्माला येत आहेत. स्पर्म डोनर हजारो वेळेला स्पर्म डोनेट करतात आणि त्यामुळे जगभरात कुठेही त्यांच्या सारखे दिसणारे जन्माला येऊ शकतात.

सगळे जग कालांतराने एक सारखे दिसू लागले तर त्याचे तोटे अनेक होणार आहेत. एखादा भयंकर संसर्गजन्य रोग आला तर त्याची लागण होण्यापासून कुणीच वाचू शकणार नाही. शिवाय माणसाची प्रतिकार शक्ती कमी होत जाईल. आज जगात एकूण लोकसंखेच्या २ टक्के जुळी आहेत. पण त्यांचीही संख्या वाढती असून दरवर्षी १६ लाख जुळी जन्माला येत आहेत असे सांगितले जात आहे.