काळ्या पैशाला अमरत्वाचे वरदान?

नोटबंदी नंतर सुद्धा काळा पैसा कमी झालेला नाही याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. कनोजच्या अत्तर व्यापार्ऱ्यावर धाड घालून जप्त केले गेलेले कोट्यावधी रुपये तसेच प. बंगालचे माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या विविध घरांवर छापे घालून जप्त केलेली कोट्यावधीची रक्कम हे त्याचे पुरावे म्हणता येतील. ज्या पैशांवर कर भरलेला नसेल त्याला ढोबळपणे काळा पैसा असे म्हटले जाते.  देशात सुमारे ३ ते ४ लाख कोटी काळा पैसा असावा या अंदाजाने आणि नोटबंदी करून  त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राने ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात यातून फक्त १.३ लाख कोटींचा काळा पैसा बाहेर येऊ शकला होता.

आरबीआयच्या २०१७ पासून २०२२ पर्यंतच्या वार्षिक अहवालातील आकडेवारी नुसार ५०० व २००० रुपये मूल्याच्या १६८० कोटी नोटा चलनातून गायब आहेत. या नोटांचे मुल्य ९.२१ लाख कोटी आहे. खराब झाल्यामुळे रद्द केलेल्या नोटांचा यात समावेश नाही. यातील बरीचशी रक्कम सर्वसामान्य लोकांच्या घरात बचत म्हणून ठेवलेली असू शकते असे मानले तरी बरीच मोठी रक्कम आज काळा पैसा स्वरुपात असावी असा अंदाज अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. याचाच अर्थ काळ्या पैशाला अमरत्वाचे वरदान आहे असे मानले जात आहे.

आरबीआयने ५०० व २००० रुपये मूल्यांच्या ६८४८ कोटी नोटा छापल्या होत्या. पैकी १६८० कोटी नोटा चलनातून गायब झाल्या आहेत. याच नोटांच्या स्वरुपात बहुतेक काळा पैसा जमविला जात आहे. त्यावर उपाय म्हणून २०१९ पासून २००० रुपये मूल्याच्या नोटा छपाई बंद केली गेली आहे. पण त्या ऐवजी ५०० रुपयाच्या नोटांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकार दरवर्षी कुठल्या मूल्याच्या, किती नोटा नव्या छापायच्या याचा निर्णय घेते. सध्याच्या ५०० व २००० रुपये नोटा ५ ते ७ वर्षे टिकतात. गेल्या ६ वर्षात ४०० कोटी नोटा खराब झाल्यामुळे नष्ट केल्या गेल्या असल्या तरी १६८० कोटी नोटांचा हिशोब लागू शकलेला नाही. शिवाय बनावट नोटा चलनात येत आहेत. याचाच अर्थ काळ्या पैशाचे आव्हान सरकार समोर कायम राहिले आहे.