नवरात्री निमित्त नवजोतसिंग सिद्धूचे नऊ दिवस मौन

रोड रेज खाली पतियाला तुरुंगात एक वर्षाची शिक्षा भोगत असलेला माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचा माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू याने नवरात्री निमित्त तुरुंगात नऊ दिवस मौन धारण केल्याचे त्याची पत्नी नवजोत हिने सिद्धूच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट केले आहे. या ट्वीट प्रमाणे नवजोतसिंग नऊ दिवस कुणालाही भेटणार नाही आणि बोलणार नाही. तो नवरात्राचे उपवास करत असल्याचेही म्हटले गेले आहे.

सध्या सिद्धू डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घेत आहे. मात्र तो एक अक्षरही न बोलता खुणेने अथवा लिहून दाखवून संवाद साधतो आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार जेल अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू शांत आहे. रोजचे व्यवहार करतो आहे. तो दर नवरात्रात उपवास करतो आणि मौन धारण करतो असे म्हणतात पण आम्हाला त्याची माहिती नाही. देवी दुर्गामातेवर त्याची नितांत श्रद्धा आहे आणि दरवर्षी तो वैष्णोदेवीच्या दर्शनाला जातो असेही सांगितले जात आहे.

मात्र सिद्धूचे विरोधक निराळीच कथा सांगत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार लुधियाना येथील न्यायालयात सिद्धूचा जबाब नोंदविला जाणार आहे. एका माजी मंत्र्याच्या विरोधातील महत्वाची फाईल सिद्धूच्या कार्यकाळात गायब झाली होती त्यासंदर्भातील हा जबाब आहे आणि सिद्धूला तो द्यायचा नाही त्यामुळे त्याने मौन असल्याचे कारण दिले आहे.