या नेत्यांच्या अंत्यसंस्कारावर झाला होता कोट्यावधींचा खर्च

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात असून यासाठी जपान सरकार ९७ कोटी रुपये खर्च करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आबे यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जपान येथे पोहोचले आहेत. पण जपान मधील नागरिक मात्र करदात्यांच्या पैशातून केल्या जाणाऱ्या या प्रचंड खर्चाबद्दल विरोध करत आहेत. आबे यांची ८ जुलै २०२२ रोजी नारा शहरात एका व्यक्तीने गोळी घालून हत्या केली होती. त्यांच्यावर १२ जुलै रोजी कौटुंबिक पातळीवर बौद्ध परंपरेने अंत्यसंस्कार केले गेले आहेत. आज होत असलेले अंत्यसंस्कार प्रतीकात्मक स्वरूपाचे आहेत असे समजते.

जगातील अनेक देशांच्या नेत्यावर असे सरकारी खर्चाने महागडे अंत्यसंस्कार केले गेले आहेत. त्यातील काही नेते असे- अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेते रोनाल्ड रीगन यांचे निधन २००४ मध्ये झाले. ११ जून रोजी लाखो लोक वॉशिंग्टन मध्ये त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जमले होते. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासात हे सर्वात महागडे फ्युनरल मानले जाते. रीगन वयाच्या ९३ व्या वर्षी दीर्घ आजाराने मृत्यू पावले होते आणि त्यामुळे संपूर्ण अमेरिकेतील जवळ जवळ सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या अंत्यसंस्काराचा खर्च वाढण्यामागे असे कारण सांगितले जाते कि अमेरिकेत एक दिवसाचा शोक जाहीर केला होता आणि स्टॉक मार्केट बंद होते व सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली गेली होती. या मुळे झालेले नुकसान अंत्यसंस्कार खर्चात धरले गेले होते. त्यामुळे हा खर्च ३२५०.२२ कोटी रुपये होता.

उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग इल म्हणजे सध्याच्या किम जोंग उनचे वडील २८ डिसेंबर २०११ रोजी मरण पावले तेव्हा राष्ट्रीय शोक जाहीर केला गेलाच पण नागरिकांना जबरदस्तीने रडायला लावले गेले होते. १९९४ ते २०११ या काळात ते सत्तेवर होते. त्यांच्या निधनानिमित्त ११ दिवसांचा दुखवटा होता आणि त्यांच्या अंत्यसंस्कारावर ३२५.०२ कोटी रुपये खर्च केले गेले होते.

अमेरिकेचे ३५ वे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ मध्ये हत्या झाली. जगभर केनेडी यांच्याकडे सन्मानाने पाहिले जात असे. त्यांची हत्या हा केवळ अमेरिकेला नव्हे तर जगाला धक्का होता. त्यांच्या अंत्यसंस्कारावर १२१.८८ कोटी रूपये खर्च केले गेले होते. ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्सेस डायना हिने राजपरिवाराचा त्याग केला होता. ३१ ऑगस्ट १९९७ मध्ये पॅरीस येथे कार अपघातात तिचा मृत्यू झाला होता. तिने राजपरिवाराचा त्याग केल्याने तिच्यावर सरकारी खर्चाने अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला गेला मात्र नागरिकांनी त्याला विरोध केला. अखेर एलिझाबेथ राणीने काही विधी राजपरिवाराच्या पद्धतीने करण्यास मंजुरी दिली होती. डायनाच्या अंत्यसंस्कारासाठी ४४.११ कोटी रुपये खर्च केला गेला होता.