200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, पटियाला हाऊस कोर्टातून अंतरिम जामीन मंजूर


200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीला पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची 15 तास चौकशी केली. ईडीच्या चौकशीनंतर सुकेश आणि जॅकलीनचे घट्ट नाते असल्याचा दावा बळकट झाला, त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानंतर आज जॅकलिन कोर्टात हजर झाली.

17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलीनला 200 कोटींच्या वसुली प्रकरणातही आरोपी आढळली होती. त्यानंतर जॅकलिनच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, आता जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. तिला अंतरिम जामीन मिळाला आहे.

जॅकलिनच्या स्टायलिस्टची करण्यात आली चौकशी
जॅकलिन फर्नांडिसची ड्रेस डिझायनर लिपाक्षीची 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केली. ज्यामध्ये लिपाक्षीने सुकेश आणि जॅकलिनबद्दल अनेक खुलासे केले होते. सुकेशने जॅकलिनला कपडे आणि भेटवस्तू देण्यासाठी तिला तीन कोटी रुपये दिल्याची कबुली तिने दिली आहे. चंद्रशेखरच्या अटकेच्या वृत्तानंतर जॅकलीन फर्नांडिसने त्याच्याशी संबंध तोडले, असेही लिपक्षी इलावाडीने सांगितले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनशिवाय नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात जॅकलिन आणि नोराशिवाय अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.