अनंत अंबानींनी खासगीत घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, मुख्यमंत्र्यांची अंबानी कुटुंबासोबतची महिन्याभरातील दुसरी भेट


मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. ही एक खासगी बैठक होती, सुमारे तासभर चालल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावेळी या दोघांशिवाय तेथे कोणीही उपस्थित नव्हते. अनंत अंबानी रिलायन्सने सादर केलेल्या उत्तराधिकार योजनेअंतर्गत कंपनीचा ऊर्जा व्यवसाय हाताळतात.

कधी आणि कुठे भेटले
या भेटीत एकनाथ शिंदे आणि अनंत अंबानी यांच्यात काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही पूर्वनियोजित बैठक नव्हती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमाचा भाग नव्हता.

एका महिन्यात मुख्यमंत्र्यांनी अंबानींची दुसऱ्यांदा भेट घेतल्याची ही दुसरी घटना होती. याआधी ते 1 सप्टेंबर रोजी अंबानी कुटुंबाचे निवासस्थान अँटालिया येथे गेले होते. त्यावेळी निमित्त होते गणेश उत्सवाचे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.

गौतम अदानी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
यापूर्वी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 21 सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दीर्घ संवाद झाला. ज्या दिवशी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धारावी पुनर्नियोजन प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी ही बैठक झाली. हा प्रकल्प पुन्हा रुळावर आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक बैठका घेतल्या होत्या.

अदानी आणि ठाकरे यांच्या भेटीनंतरच अनंत अंबानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. या सभेने महाराष्ट्रात चर्चेचा बाजार चांगलाच तापला आहे.