महाराष्ट्रातून जाणार अयोध्या राममंदिराच्या दरवाजांसाठी सागवान

अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राममंदिराच्या गर्भगृहाचे काम वेगाने सुरु असून येथे १२ पेक्षा अधिक दरवाजे आहेत. त्यासाठी सागवानी लाकडाचा वापर केला जात असून हे लाकूड महाराष्ट्रातून अयोध्येला पाठविले जात आहे. मंदिराच्या चौकटी आणि दरवाजे या लाकडापासून बनविले जाणार आहेत. गर्भगृहाचे ४० टक्के काम पूर्ण झाल्याचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.

राय म्हणाले, मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी आहे. येथील पिलर साठी बन्सी पहाडपूर येथील दगड आणले गेले असून मकराना येथील उच्च दर्जाच्या शुभ्र संगमरावरचा वापर केला जात आहे. येथील सर्व खांबांवर कोरीव काम केले जात आहे त्यासाठी ५०० कुशल कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. मंदिराच्या बांधकाम प्रगतीचा तसेच येणाऱ्या अडचणीचा रिपोर्ट दर महिना बैठक घेऊन पंतप्रधान कार्यालयाला पाठविला जातो.

मंदिराचे गर्भगृह अतिशय विशाल आहे आणि येथे एकावेळी २५ हजार भाविक बसु शकतील असेही राय यांनी सांगितले. मंदिराचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.