कामाख्या मंदिरात १५ दिवस साजरे होते नवरात्र

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या गटातील ४० आमदार फुटून आसामच्या गोवाहाटी येथे अनेक दिवस मुक्काम टाकून होते आणि त्यांनी कामाख्या मंदिरात पूजा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तेव्हापासून दुर्गेच्या ५२ शक्तीपीठामधील महत्वाचे पीठ असलेले हे मंदिर विशेष चर्चेत आहे. या मंदिरात नवरात्र सुरु झाले असून याचे विशेष म्हणजे येथे १५ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. याला पखूआ असे म्हटले जाते. या मंदिर समूहात लहान मोठी १० मंदिरे आहेत आणि गर्भगृहात सोन्याचे तीन दरवाजे आहेत. या महापिठात देवीची मूर्ती नाही. हे तंत्रपीठ म्हणून ओळखले जाते.

येथील नवरात्र उत्सवाची सुरवात १९ सप्टेंबरला झाली असून कृष्ण पक्षातील नवमी तिथीला हा उत्सव सुरु होतो आणि शुक्ल पक्ष नवमीला समाप्त होतो. येथील दुर्गा पूजेचे स्वरूप एकदम वेगळे आहे. येथे दुर्गा पूजेबरोबर कन्यापूजन होते. जगातील सर्वोच्च कुमारी तीर्थामधील हे एक असून त्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे. नवरात्र सुरु होण्याच्या वेळी एका कुमारीचे, दुसऱ्या दिवशी दोन कुमारी असे एकूण ४५ कुमारीचे पूजन येथे केले जाते. या पूजनामुळे सर्व संकटे दूर होतात असा विश्वास आहे.

कुमारी पूजन हे नारी शक्तीच्या सृजन, स्थिरता आणि विनाश यांना नियंत्रित करण्याचे प्रतिक आहे. येथील पुजाऱ्यांच्या इतिहास खूप जुना आहे. १० व्या शतकातील पाल राजवंशाने हे पुजारी उत्तर प्रदेशच्या कनोज येथून आणले असे सांगितले जाते. सध्या येथे अशी ५ पुजारी कुटुंबे आहेत. हे स्थान महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाच्या पूर्वीपासूनचे आहे असे मानले जाते. नरकासुराने येथे मंदिर बांधले होते. त्याचा मुलगा भगदत्त हा कामरूप म्हणजे आत्ताच्या आसामचा राजा होता आणि युद्धात तो कौरवांकडून लढला होता.