अर्जुन तेंदुलकर प्रशिक्षण देताहेत योगराज सिंग

मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर यांचा मुलगा अर्जुन सध्या चंदिगढ मध्ये असून अखिल भारतीय जेपी अत्री स्मृती क्रिकेट स्पर्धेत गोवा संघाकडून खेळतो आहे. त्याला टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचे वडील योगराज धडे देत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. योगराज टीम इंडियाकडून १९८० मध्ये खेळलेले आहेत.

योगराज गेला आठवडा २३ वर्षीय अर्जुनला प्रशिक्षण देत आहेत. टीम इंडियाकडून योगराज एकमेव टेस्ट खेळले असले तरी त्यांनी पंजाबी चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि कोच म्हणूनही नाव कमावले आहे. १९८१ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी खेळून त्यांनी त्यात एक विकेट घेतली होती. त्यांनी ६ वनडे मध्ये चार विकेट घेतलेल्या आहेत. फर्स्ट क्लास दर्जाचे ६६ सामने ते खेळले आहेत. मात्र युवराज प्रमाणे त्यांचे क्रिकेट करियर बहरले नाही. युवराज ला ऑलराउंडर बनविण्यात योगराज यांचे मोठे योगदान आहे.

आयपीएल मध्ये पंजाब किंग्स तर्फे खेळणाऱ्या मनन वोहरा यालाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. योगराज अतिशय कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. अर्जुन तेंडूलकर याला फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये डेब्यूची संधी अजून मिळालेली नाही. आयपीएल मध्ये तो मुंबई इंडियन्स टीम मध्ये होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. मुंबई तर्फे संधी न मिळाल्याने तो गोवा तर्फे खेळणार आहे असे समजते.