शी जिनपिंगना हटवून ली क्याओमिंग हाती घेणार सत्ता?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची जागा चीनी पीपुल्स लिबरेशन आर्मीचे सर्वात वरिष्ठ अधिकारी, सेना जनरल ली क्याओमिंग यांनी घेतली असल्याच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. गेले तीनचार दिवस सोशल मिडीयावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना नजरकैदेत टाकल्याची चर्चा होत आहे आणि चीन मध्ये सेनेने सत्तापालट केल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. या अफवा कि सत्य हे लवकरच उजेडात येईल. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे सोशल मिडीयावर येत असलेल्या या बातम्या अन्य कुठून नाही तर चीन मधूनच येत आहेत.

शी जिनपिंग यांची जागा घेणारे ली क्याओमिंग  सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२२ इतका काळ सैन्य जनरल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तीन थियेटर कमांडचे कमांडर म्हणून सेवा दिली आहे. चीनी सेनेत विभिन्न महत्वपूर्ण पदांवर काम केले असून त्यात ३६१ रेजिमेंटचे चीफ ऑफ स्टाफ, ३६४ रेजिमेंटचे कमांडर, १२४ डिव्हिजनचे चीफ ऑफ स्टाफ, ४२ व्या ग्रुप आर्मीचे उपचीफ ऑफ स्टाफ व ४२ व्या सेनेच्या १२४ डिव्हिजन कमांडर पदांचा समावेश आहे. २०१७ मध्ये त्यांना चीन कम्युनिस्ट पार्टीच्या १९व्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून निवडले गेले होते.

शी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्यामागे अनेक संदर्भ दिले जात आहेत. शी जिनपिंग यांच्या बीजिंग मधील निवासस्थानाबाहेर होत असलेले सैन्याचे अभूतपूर्व आंदोलन, जिनपिंग यांच्या घराला पडलेला ८०० हून अधिक लष्करी वाहनाचा वेढा तसेच कोणतेही कारण न देता रद्द झालेली ९ हजाराहून अधिक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे हे सत्ता पालट झाल्याचे लक्षण असू शकते असे म्हटले जात आहे.