या गावात संध्याकाळी भोंगा वाजला कि बंद होतात टीव्ही, मोबाईल

टीव्ही, मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणाचा सतत वापर माणसासाठी हानिकारक असल्याचे अनेक पुरावे मिळत असले तरी या वस्तूंचे लागलेले व्यसन कमी होण्याचे नाव नाही. यामुळेच महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव या छोट्याश्या गावाने ‘डिजिटल डीटॉक्स’ होण्याचा एक अनोखा प्रयोग राबविला असून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

डिजिटल डीटॉक्स म्हणजे इलेक्ट्रोनिक उपकरणांपासून काही काळ दूर राहणे. त्यासाठी वडगाव मध्ये मंदिरात सायंकाळी सात वाजता भोंगा वाजविला जातो. यावेळी गावातील सर्व नागरिक टीव्ही, मोबाईल अथवा अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणे बंद करतात. दीड तासानंतर म्हणजे साडे आठ वाजता पुन्हा भोंगा वाजतो आणि मग नागरिक ही उपकरणे पुन्हा वापरू शकतात. ३१०५ लोकवस्ती असलेल्या या गावाचे सरपंच विजय मोहिते यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला गावकऱ्यानी उत्स्फूर्त साथ दिली. मोबाईल बंद असलेल्या काळात वाचन, शाळेचा अभ्यास, घरातील माणसांशी गप्पा असे उद्योग केले जातात.

या विषयी माहिती देताना मोहिते म्हणाले, करोना काळात शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन वर्ग सुरु झाले त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल आले. आई वडिलांचा टीव्ही पाहण्याचा वेळ वाढला. पण करोना कमी झाल्यावर शाळा सुरु झाल्या तरी मुलांच्या हातात मोबाईल कायम राहिले आणि घरातील लोक सुद्धा जास्त वेळ टीव्ही पाहात राहिले. शिक्षकांच्या लक्षात विद्यार्थी आळशी बनल्याचे आले होतेच. आमच्या गावात मुलांना अभ्यासासाठी घरात वेगळ्या खोल्या नाहीत. यामुळे आम्ही स्वातंत्रदिनापासून ही नवी कल्पना राबविली. त्यासाठी भोंगा विकत घेतला. आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी घरोघर जाऊन या मोहिमेबाबत जागृती केली आणि त्याचा चांगला उपयोग होत आहे.

मोहिते म्हणाले आमचे गाव स्वातंत्रसैनिकांचे गाव आहे. राज्य, केंद्र शासनाचा स्वच्छ गाव पुरस्कार आम्हाला मिळाला आहे. टीव्ही, मोबाईलचे अनेक दुष्परिणाम होत आहेत आणि ते वेळेत थांबविता यावेत यासाठी आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे.