हॅरी आणि बेनच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने केला पाकिस्तानचा 63 धावांनी पराभव


इंग्लंडने शुक्रवारी रात्री पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात 63 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. कराचीमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करत 221 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि नंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना केवळ 158 धावांवर रोखले. या विजयासह इंग्लंडने सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

हॅरी आणि बेनची संस्मरणीय भागीदारी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिली विकेट लवकर गमावली. फिल सॉल्ट (8) मोहम्मद हसनैनचा बळी ठरला. मात्र, याचा परिणाम इंग्लंडच्या धावगतीवर झाला नाही. यानंतर डेव्हिड मलान (14) आणि विल जॅक (40) यांना उस्मान कादिरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. येथून हॅरी ब्रुकने 35 चेंडूत 81 धावा आणि बेन ड्युकेटने 42 चेंडूत 70 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 69 चेंडूत 139 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीमुळे इंग्लंडने निर्धारित षटकात तीन गडी गमावून 221 धावा केल्या.

शान मसूदशिवाय चालला नाही पाकिस्तानचा एकही फलंदाज
222 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. एकूण 28 धावांवर पाकिस्तान संघाने आपल्या टॉप ऑर्डरच्या चार विकेट्स गमावल्या होत्या. मोहम्मद रिझवान (8), बाबर आझम (8), हैदर अली (3) आणि इफ्तिखार अहमद (6) यांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. शान मसूदने 40 चेंडूत 65 धावांची खेळी करताना थोडीशी स्पर्धा दिली, पण ती अपुरी ठरली. निर्धारित षटकांत पाकिस्तान संघाला 8 गडी गमावून केवळ 158 धावा करता आल्या. अशाप्रकारे पाकिस्तान संघाचा 63 धावांनी मोठा पराभव झाला. इंग्लंडकडून या सामन्यात मार्क वुडने 3 आणि आदिल रशीदने 2 बळी घेतले.