भारताकडून पाकिस्तानला हव्यात  ७१ लाख मच्छरदाण्या

अगोदरच अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जात असलेल्या शेजारी देश पाकिस्तानची हालत पूरस्थिती मुळे आणखी बिकट झाली आहे. देशात मलेरियाचा उद्रेक झाला असून त्यामुळे आता पाकिस्तानला भारताची आठवण येऊ लागली आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार गुलाब अब्बास शाह यांनी एक ट्वीट केले असून पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सरकारकडे भारताकडून मच्छरदाण्यांची खरेदी करण्याची परवानगी मिळवावी असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या २६ जिल्ह्यात मलेरियाचा उद्रेक झाला असून तातडीने किमान ७१ लाख मच्छरदाण्या हव्या आहेत. पूरग्रस्त सिंध आणि बलुचिस्तान मध्ये गेल्या दोन महिन्यात २ लाख लोकांना मलेरियाचा संसर्ग झाला आहे. पाक अधिकाऱ्यांनी मात्र भारताकडून मदत घेण्यास नकार दिला आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तान जागतिक पातळीवर त्यांची प्रतिमा सकारात्मक बनवू पाहतो आहे. त्यामुळेच त्यांनी बांग्ला देशाची मदत सुद्धा नाकारली आहे. जिओ न्यूज नुसार पाकिस्तान मध्ये ३ कोटी नागरीक पूरग्रस्त असून त्यातील ११५९ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ हजार जखमी आहेत. गेल्या २४ तासात १५ मृत्यू झाले आहेत आणि १९ लाख घरांचे नुकसान झाले आहे. ९ लाख जनावरे मरण पावली आहेत.