एलोन मस्क यांच्या स्टारलिंकची इराणला मोफत इंटरनेट सेवेची तयारी

इराण मध्ये हिजाब घालण्यास नकार दिल्याबद्दल अटक केलेल्या २२ वर्षीय महसा अमिनीचा पोलिसांनी अटक केल्यानंतर झालेल्या मृत्यू विरोधात इराण मध्ये जोरदार निदर्शने सुरु असतानाच स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या स्टार लिंकच्या माध्यमातून इराण मध्ये मोफत इंटरनेट सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लींकन यांच्या एका ट्वीट ला उत्तर देताना मस्क यांनी वरील विधान केले आहे. ते म्हणाले, इराणला फ्री इंटरनेट आणि माहितीचा मोफत प्रवाह उपलब्ध व्हावा यासाठी अमेरिकेने कारवाई करायला हवी.

अमेरिकेच्या अर्थ विभागाने इराणवर प्रतिबंध घातले असून इराण साठी उपलब्ध इंटरनेट सेवा वाढवा यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार अर्थविभागातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांना स्टार लिंक बद्दल सांगताना, कंपनी जी सेवा देते ती उत्तम दर्जाची असल्याचे सांगितले आहे. तसेच कंपनीचे हे हार्डवेअर नेहमीच्या सामान्य परवान्यात येत नसेल तर त्यासाठी ट्रेझरीला पत्र द्यायला हवे असे नमूद केले होते. त्यावर परराष्ट्र विभागाने स्टार लिंकला इराण मध्ये सेवा देण्यासाठी विशेष परवाना हवा असेल तर त्यांचे स्वागत आहे, त्यांना असा परवाना प्राधान्याने दिला जाईल असेही स्पष्ट केले आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर युक्रेन मधील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती तेथेही मस्क यांनी त्यांच्या स्टार लिंकच्या माध्यमातून इंटरनेट सेवा सुरु केली आहे.