मोदींच्या हत्येचा पीएफआयने रचला होता कट- ईडीचा दावा

ईडी म्हणजे सक्तवसुली संचलनालयाने गुरुवारी केरळ मधून अटक केलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया)चा सदस्य शफिक पाथेय याला कस्टडीची मागणी करताना सनसनाटी दावा केला आहे. ईडीच्या दाव्यानुसार या वर्षी १२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पटना यात्रेत त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी एक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. पीएफआयने मोदी रॅली हे टार्गेट ठरविले होते आणि उत्तर प्रदेशातील संवेदनशील ठिकाणे आणि काही व्यक्तींवर हल्ले चढविण्याच्या हेतूने दहशतवादी मोड्यूल,घातक शस्त्रे व स्फोटकांचा संग्रह करण्यात या संघटनेचा हात होता असाही दावा केला आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर २०१३ मध्ये पटना येथे गांधी मैदानावर मोदी यांच्या सभेत बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी मोदी पंतप्रधान नव्हते तर भाजपचे प्रचार समिती अध्यक्ष होते. त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीन शी संबंधित या दहशतवादी कारवाईत प्रतिबंध घातल्या गेलेल्या  सिमी म्हणजे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंटचा सदस्य सामील होता आणि पीएफआय संघटनेचा सुद्धा हात होता. गेल्या काही वर्षात या संघटनेने जमा केलेल्या १२० कोटींचे विवरण मिळाले असून हे पैसे रोख स्वरुपात होते. याचा उपयोग देशभर दंगे, दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. यामुळेच २२ सप्टेंबर २०२२ रोजी पीएफआय विरुद्ध देशव्यापी छापा सत्र राबविले गेले असून चार जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे तर राष्ट्रीय तपास यंत्रणेने १०० हून अधिक सदस्यांना ताब्यात घेतले आहे.