किती मेगापिक्सलचे असतात माणसाचे डोळे?
नवा मोबाईल किंवा नवा कॅमेरा खरेदी करायचा असेल तर आपण सर्वप्रथम किती मेगापिक्सल क्षमता आहे हे जाणून घेतो. जास्त मेगापिक्सल असेल तर फोटो अधिक स्पष्ट येतात आणि कमी मेगापिक्सल असेल तर पिक्चर क्वालिटी कमी असते. माणसाचे डोळे हे कॅमेऱ्याचेच काम करत असतात. दिवस उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात आपण डोळ्याने अनेक वस्तू, दृश्ये पहात असतो पण त्याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नसते.
मानवी डोळ्याची रचना मोठी गुंतागुंतीची आहे आणि रोचक सुद्धा आहे. असे म्हटले जाते की निरोगी डोळे ५७६ मेगापिक्सलचे दृश्य दाखविण्यास सक्षम असतात. याचा अर्थ एका वेळी आपण ५७६ मेगापिक्सल क्षेत्रफळ पाहू शकतो पण मेंदू एकावेळी एवढे दृश्य प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे या दृश्यातील काही भाग आपल्याला स्पष्ट किंवा एकदम स्वच्छ( हाय डेफिनेशन) दिसतो. विविध ठिकाणी फोकस करून आपण पूर्ण दृश्य पाहू शकतो.
अर्थात माणसाचे वय वाढत चालले कि जसे शरीराच्या अन्य अवयवांची क्षमता कमी होते तशीच डोळ्यांची क्षमता सुद्धा कमी होत जाते. रेटीना कमजोर झाल्यामुळे डोळे अधू होतात. आपण जर डीएसएलआर कॅमेरा किंवा मोबाईल कॅमेरा विचारात घेतला तर ४०० एमपी फोटोची त्यांची क्षमता असते. मोबाईल मध्ये ४८ एमपी, ६० एमपी क्षमतेचा कॅमेरा दिला जातो आहे तर काही मोबाईल मध्ये आता १०८ एमपीचा कॅमेरा सुद्धा दिला जात आहे. पण निसर्गाने माणसाला डोळे स्वरुपात प्रचंड क्षमतेचा कॅमेरा दिला आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी आणि निगा राखणे आवश्यक आहे.