PAK vs ENG : बाबर आझमची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, मोडला विराटचा रेकॉर्ड, इंग्रजांना बसला धक्का!


कराची : खराब फॉर्मशी झुंजत असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी खेळी खेळली, ज्याने अनेक विक्रम मोडीत काढले. 200 धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने 66 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 110 धावा केल्या. त्यांच्याशिवाय मोहम्मद रिझवानने 51 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने 3 चेंडू राखत आणि 203 धावा करून सामना जिंकला. या विश्वविक्रमी विजयादरम्यान बाबरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

कर्णधारपदाच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी
याआधी, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्वित्झर्लंडचा फहीम नाझीर यांच्या नावावर कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आहे. या दोघांनी 2-2 शतके झळकावली होती. आता या यादीत बाबर आझमचे तिसरे नाव जोडले गेले आहे. तसेच पाकिस्तानकडून दोन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.

मोडला विराटचा विक्रम
बाबर आझमने आपल्या शतकी खेळीत 8000 टी-20 धावा पूर्ण केल्या. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलनंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला. पाकिस्तानच्या कर्णधाराने विराट कोहलीचा 243 डावात 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडला. त्याने 218 डावात हा टप्पा गाठला. गेलने 214 डावात 8000 धावा केल्या होत्या.

  • ख्रिस गेल – 214 डाव
  • बाबर आझम – 218 डाव
  • विराट कोहली – 243 डाव
  • आरोन फिंच – 254 डाव
  • डेव्हिड वॉर्नर – 256 डाव

लक्ष्यांचा पाठलाग करताना सर्वात मोठी सलामी भागीदारी

  • बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान – 203 धावा विरुद्ध इंग्लंड (2022)
  • बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान – 197 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2021)
  • आरोन फिंच आणि जेसन रॉय (सरे) – मिडलसेक्स विरुद्ध 194 धावा (२०१८)
  • नमन ओझा आणि डेव्हिड वॉर्नर (दिल्ली डेअरडेव्हिल्स) – डेक्कन चार्जर्स विरुद्ध 189 धावा (2012)
  • नील ब्रूम आणि ब्रेंडन मॅक्युलम (ओटागो) – 188 धावा विरुद्ध नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स (2012)

पाकिस्तानने विश्वविक्रम केला
यासह पाकिस्तानने 200 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. आतापर्यंत कोणत्याही संघाला टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशी कामगिरी करता आली नव्हती.