Mahsa Amini Death : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूवरून वाद सुरूच, अमेरिकेने लादले निर्बंध, गोठवली मालमत्ता आणि बँक खाती


वॉशिंग्टन : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधात युद्ध सुरू झाले आहे. हिंसक आंदोलनांची आग अनेक शहरांमध्ये पसरली आहे. सरकारी मालमत्तेचेही नुकसान होत आहे. महसा अमिनी यांच्या मृत्यूमुळे इराणवर जगभरातून टीका होत आहे. दरम्यान, आंदोलकांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने इराणमधील नैतिकता पोलिस आणि सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत.

इराणमध्ये 22 वर्षीय अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबवरून झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये अनेक आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अमेरिकेने लादले निर्बंध
यूएस ट्रेझरीने इराणच्या गुप्तचर आणि सुरक्षा मंत्रालयातील अधिकारी, सैन्य दल आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना प्रतिबंधांसाठी सूचीबद्ध केले आहे. या निर्बंधांमुळे त्यांना यूएसमधील त्यांच्या मालमत्ता आणि बँक खात्यांमध्ये प्रवेश नाकारला जाईल. हे अधिकारी शांततापूर्ण निदर्शक आणि इराणी नागरी समाजाचे सदस्य, राजकीय असंतुष्ट, महिला हक्क कार्यकर्ते आणि इराणी बहाई समुदायाच्या सदस्यांना दडपण्यासाठी नियमितपणे हिंसाचारात गुंतलेल्या संघटनांवर देखरेख करतात, ट्रेझरीने एका बातमीत म्हटले आहे.

कसा झाला महसा अमिनीचा मृत्यू?
महसा अमिनी आपल्या कुटुंबासह तेहरानला भेट देण्यासाठी गेली असता इराण पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. हिजाब घातला नाही म्हणून तिला अटक करून मारहाण करण्यात आली. ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी अमिनीचा मृत्यू झाला. पोलिस म्हणतात की अमिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे नाकारले. त्याचवेळी, त्यांना हृदयविकाराचा कोणताही इतिहास नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधातील गदारोळ सुरूच आहे.