पुतीन यांचा सैन्य भर्ती आदेश, देश सोडून नागरिकांचे पलायन

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी तत्काळ सैन्य भरतीचा आदेश लागू केल्याने रशियन नागरिक देशाबाहेर जाण्यासाठी एकच गर्दी करू लागले असल्याचे दिसून आले आहे. रशियन लोकांना तुर्कस्थान किंवा आर्मेनिया या देशात जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. त्यामुळे या दोन देशांना जाणाऱ्या सर्व विमानांची तिकिटे विकली गेली असून सर्व फ्लाईट फुल झाल्या आहेत. परिणामी तिकीट दर प्रचंड वाढले आहेत.

रॉयटर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार युक्रेन युध्द सुरु असल्याने पुतीन यांनी तत्काळ सैन्य भरतीचे आदेश दिले आहेत. यामुळे रशियन नागरिकांना सेनेत भरती होण्यायोग्य तरुणांच्यावर देश सोडून जायची बंदी घातली जाईल अशी भीती वाटते आहे. वास्तविक सैन्य भरतीचे आदेश देताना ज्यांनी पूर्वी सेनेत नोकरी केली आहे त्यांची भर्ती केली जाणार असल्याचा खुलासा केला गेला आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर रशियन नागरिक देशाबाहेर पडण्यास उत्सुक आहेत.

तुर्कस्तानला जाणारी सर्व उड्डाणे फुल्ल झाली असून विमान तिकिटे संपली आहेत. एविया सेल्स या लोकप्रिय फ्लाईट बुकिंग साईटवर मास्को इंस्तांबुल साठी तुर्की विमान कंपनीची सर्व तिकिटे विकली गेल्याचे म्हटले गेले असून तिकिटांचे दर सुद्धा भडकले आहेत. गुगल फ्लाईट डेटा नुसार एक वेळच्या प्रवासासाठी पूर्वी २२ हजार रुबल असलेले तिकीट आता ७० हजार रुबल्सवर गेले आहे. स्टॉप ओव्हर फ्लाईटसची सर्व तिकिटे संपली आहेतच पण दुबई साठीच्या सर्वात स्वस्त तिकिटाचा दर पाचपट वाढला असून तो ३ लाख रुबल्स म्हणजे ५ हजार डॉलर्सवर गेल्याचे समजते.