या करारामुळे रिलायंस, अदानी समूहातील कर्मचारी अडचणीत?

देशातील दोन बडे उद्योजक रिलायंस समूहाचे मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्या समूहात काम करणारे सुमारे ४ लाख कर्मचारी आता एका करारामुळे काहीसे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन कंपन्यांनी आपसात ‘नो पोचिंग’ करार केला आहे. यालाच ‘नो हायर अॅग्रीमेंट’ असेही म्हटले जाते. अर्थात या कराराला कायदेशीर बंधन नाही तर दोन किंवा त्याहून अधिक कंपन्या परस्पर विश्वासावर असे करार करू शकतात. अदानी आणि अंबानी यांच्यात हा करार मे मधेच झाल्याचे सांगितले जात आहे.

या करारानुसार रिलायंस मधील कुणीही कर्मचारी अदानी समूहात किंवा अदानी समूहातील कुणी कर्मचारी रिलायंस समूहात नोकरी घेऊ शकणार नाहीत. रिलायंस समूहात सुमारे ३ लाख ८० हजार तर अदानी समूहात २३ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. या दोन कंपन्या आता टेलिकॉम, ग्रीन एनर्जी, फूड आणि बायोगॅस, पेट्रोलियम, इंटरनेट या क्षेत्रात एक मेकांच्या स्पर्धेत येणार आहेत. अश्या वेळी एका कंपनीतील कर्मचारी अधिक पगार किंवा अधिक सुविधा मिळतात म्हणून दुसर्या कंपनीत जाण्याचे प्रमाण वाढते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी असे करार केले जातात.

१९९० मध्ये टॅलंट वॉर हा नवा शब्द चर्चेत आला होता. त्यावेळी जगभर कुशल कामगारांची कमतरता जाणवू लागली होती. त्यामुळे जेथे चांगली संधी आहे तेथे पहिली नोकरी सोडून जाण्यास कुशल कामगार प्राधान्य देऊ लागले होते. तेव्हा पासूनच असे नो पोचिंग करार करण्याची प्रथा सुरु झाल्याचे सांगितले जाते. अर्थात आहे त्याच पगारावर आणि आहे त्याच पदावर नोकरी बदल करण्याची सुविधा यात असते.