बंगाल मध्ये दोन प्रकारे होते दुर्गापूजा
गणपती उत्सव संपला कि वेध लागतात शारदीय नवरात्राचे. भारतात सणउत्सवाची संख्या प्रचंड आहे आणि जेवढी राज्ये तेवढे प्रत्येक राज्याचे खास उत्सव सुद्धा आहेत. महाराष्ट्रात गणपती हा मोठा उत्सव साजरा केला जातो तर दक्षिणेकडे ओणम हा उत्सव वर्षातला महत्वाचा उत्सव असतो. असेच महत्व बंगाल मध्ये दुर्गा पूजा उत्सवाला आहे. या काळात संपूर्ण बंगाल दुर्गामय झालेला दिसतो. मोठमोठे मांडव ठिकठिकाणी घातले जातात, सजावटी केल्या जातात, विविध प्रकारचे लाईट, सजावटीची शोभा रंगीबेरंगी करतात आणि अनेक प्रकारच्या स्टॉल्सने आसपासचे परिसर भरून जातात. दुर्गेच्या मोठ मोठ्या मूर्ती मांडवात विराजमान होतात आणि शेकडो भाविक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
एकंदरीत बंगाल मध्ये दुर्गा पूजा उत्सव नवी चेतना घेऊन येतो. बंगाल मध्ये दुर्गा पूजा दोन प्रकारे होते. एक प्रकार म्हणजे सार्वजनिक दुर्गा पूजा. जी महाराष्ट्रातील गणपती प्रमाणे विविध ठिकाणी मांडव घालून केली जाते. त्याला पारा दुर्गा पूजा म्हटले जाते. पारा म्हणजे गल्ली, मोहल्ला. त्या त्या भागापुरत्या या पूजा मर्यादित असतात. अर्थात सार्वजनिक जागी मांडव घालून दुर्गा मातेची स्थापना केली जाते. या पूजा भव्य स्वरुपात होतात. अनेकदा त्यासाठी काही विशेष थीम असतात.
दुसरा प्रकार म्हणजे बारेर पूजा. महाराष्ट्रात जसा सार्वजनिक मंडळाचा गणपती आणि घरोघरी गणपती असतात तसाच हा प्रकार, बारी किंवा बाडी म्हणजे घर. पण येथे सरसकट सर्व घरातून दुर्गा स्थापना होत नाही तर श्रीमंत, प्रतिष्ठीत घरातून किंवा ज्यांच्याकडे पारंपारिक अशी पूजा असते त्या घरातून ही पूजा होते आणि त्याला कुटुंबीय, नातेवाईक हजर असतात. परगावी असलेले परिवारातील लोक मुद्दाम या पूजेसाठी घरी येतात. कुटुंब एकत्र येते आणि दुर्गेचा आशीर्वाद घेते. यामुळे परस्पर संबंध अधिक द्रुड होतात असा विश्वास आहे.