अंटार्टीका वर ओणम रांगोळी, आनंद महिन्द्रानी शेअर केला व्हिडीओ

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मिडीयावर खूपच सक्रीय असतात आणि अनेक अनोखे व्हिडीओ सातत्याने शेअर करत असतात. त्यांनी नुकताच असाच एक व्हिडीओ शेअर केला असून इंटरनेटवर तो वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हीडीओ मध्ये जगातील अत्यंत थंड ठिकाणी म्हणजे अंटार्टीका येथे बर्फाच्या जाड थरावर काही तरुण काही तरी खोदताना दिसत आहेत. व्हिडीओ पुढे सरकतो तेव्हा हे तरुण मरणाच्या थंडीला न जुमानता या बर्फाच्या जमीनीवर ओणम सणाच्या निमित्ताने रेखली जाणारी खास रांगोळी बनवीत असल्याचे दिसते आहे.

भारतात जितकी राज्ये आणि प्रदेश तितके विविध सण उत्सव साजरे होतात. यामुळेच जगात भारतीय संस्कृतीची वेगळी ओळख आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात भारतीय माणूस असेल तर तो आपले सण उत्सव उत्साहाने साजरे करतोच. त्याला आता दुर्गम अंटार्टीका सुद्धा अपवाद राहिलेले नाही. अंटार्टीकावरील ओणम रांगोळीच्या व्हिडीओला अल्पावधीत चार लाख व्ह्यूज आणि २४ हजार लाईक्स मिळाले आहेत. अंटार्टीकावर ओणम ची खास रांगोळी बर्फ खोदून बनविली जात असेल याचा कुणी विचारही केला नसेल.

या व्हिडीओला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोकांनी आता चंद्रावर सुद्धा ओणम साजरा होणार असे म्हटले आहे तर काहीनी भारतीयांना त्यांचे सण कुठेही साजरे करण्यापासून कुणीच रोखू शकत नाही असे म्हटले आहे.