या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केली 11 दिवसांची सुट्टी, ना पगार कापला जाणार ना बॉस फोन करणार


किती आनंद होतो, जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सांगते… जा तुमचे आयुष्य जगा. अशीच एक घोषणा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. कर्मचारी आनंदी असतील, तर त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील, असा विश्वास मीशोला आहे. कर्मचारी खूश असतील, तर ते मेहनत करतील. त्यामुळे कंपनीने 11 दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी 11 दिवसांसाठी ‘रीसेट आणि रिचार्ज ब्रेक’ची घोषणा केली आहे. मीशोने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक थकवा दूर करणे, हा या सुट्यांमागील कंपनीचा उद्देश असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या हंगामानंतर कंपनी कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या देणार आहे. सणासुदीनंतर 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत या सुट्ट्या देण्यात येणार आहेत.

रीसेट आणि रिचार्जसाठी ब्रेक
ट्विटरवर याची घोषणा करताना कंपनीचे संस्थापक आणि सीटीओ संजीव बर्नवाल म्हणाले की, आमचे प्राथमिक उद्दिष्ट आमच्या कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे आहे. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. आगामी सणांनंतर, मीशोचे कर्मचारी 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या सुट्ट्यांचा उपयोग त्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी करू शकतील. कर्मचारी या सुट्ट्यांचा उपयोग आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, कुठेतरी प्रवास करण्यासाठी करू शकतात.

मीशोचे संस्थापक आणि सीईओ विदित अत्रे यांनीही याबद्दल ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की अंतराळवीरांनाही ब्रेक आणि कंपनीमध्ये ‘मूनशॉट मिशन्स’वर काम करणाऱ्या लोकांनाही आवश्यक आहे. यापूर्वी मीशोने अनंत कल्याण सुट्टी, 30 आठवड्यांची पालक सुट्टी जाहीर केलेली आहे.