मुस्लिम धर्मगुरू उमर अहमद इलियासी यांनी मोहन भागवत यांना म्हटले ‘राष्ट्रपिता’


नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीतील मशिदीत ‘ऑल इंडिया इमाम संघटने’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत बंद खोलीत तासाभराहून अधिक वेळ ही बैठक झाली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे कार्यालय येथे आहे.

इलियासी यांनी मोहन भागवत यांना म्हटले राष्ट्रपिता
या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर इलियासी म्हणाले की, आमचा डीएनए एक आहे, फक्त अल्लाहची उपासना करण्याची पद्धत वेगळी आहे. ते म्हणाले की, मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत आणि राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट आहे असे आपण सर्व मानतो. याशिवाय, इमाम उमर अहमद इलियासी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या निमंत्रणावरून मदरशाला भेट दिली आणि येथील मुलांशी संवादही साधला.

दोन दिवसांपूर्वीही झाली होती मुस्लिम विचारवंतांची बैठक
खरेतर, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तात्पुरत्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमिरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि समाजसेवी सईद शेरवानी हेही उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीत जातीय सलोखा मजबूत करणे आणि आंतर-समुदाय संबंध सुधारण्यावर विस्तृत चर्चा झाली.

काश्मीरच्या नेत्यांना भेटू शकतात भागवत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ प्रमुख मोहन भागवत येत्या काही दिवसांत काश्मीरमधील काही मुस्लिम नेत्यांचीही भेट घेऊ शकतात. काश्मीरमध्ये निवडणुकीचे राजकारण पुन्हा सुरू झाल्यानंतर खोऱ्यात शांतता राखण्याच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक मानले जात आहे.