अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर IIFL Hurun India Rich List 2022 नुसार, गौतम अदानी यांची एका वर्षात दररोजची कमाई 1612 कोटी रुपये आहे. मात्र गौतम अदानी यांचे भाऊ विनोद शांतीलाल अदानी हेही मागे नाहीत. हुरुनने जारी केलेल्या यादीनुसार विनोद शांतीलाल अदानी हे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय आहेत.
IIFL Hurun India List : जाणून घ्या गौतम अदानी यांचा NRI भाऊ विनोद शांतीलाल अदानी यांच्याबद्दल, जे दररोज कमावतात 102 कोटी रुपये
पाच वर्षांत मालमत्तेत झाली 850 टक्के वाढ
विनोद शांतीलाल अदानी हे दुबईत राहतात आणि दुबई, जकार्ता आणि सिंगापूरमध्ये व्यवसाय सांभाळतात. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 37,400 कोटींनी वाढली आहे. विनोद शांतीलाल अदानी हे भारतातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 850 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 1.69 लाख कोटी रुपये झाली आहे. दोन्ही अदानी बंधूंच्या संपत्तीची भर घातली, तर त्यांच्याकडे एकूण 16.63 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी हुरुन श्रीमंत यादीतील टॉप 10 लोकांच्या संपत्तीच्या 40 टक्के एवढी आहे.
दररोज 102 कोटींची कमाई
एकूण 94 श्रीमंत NRI ने IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये स्थान मिळवले आहे, ज्यामध्ये विनोद शांतीलाल अदानी यांनी दररोज 102 कोटी रुपयांची मालमत्ता जोडली आहे. या यादीत हिंदुजा ब्रदर्स दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 1.65 लाख कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी निवास मित्तल यांचा क्रमांक लागतो, ज्यांची संपत्ती 1.5 लाख कोटी आहे.
दुबईत राहतात विनोद शांतीलाल अदानी
विनोद शांतीलाल अदानी यांचा प्रवास पाहता त्यांनी 1976 मध्ये भिवंडीमध्ये व्हीआर टेक्सटाईल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून यंत्रमाग उभारून प्रवास सुरू केला. यानंतर त्यांनी सिंगापूरमध्ये कार्यालय उघडले. 1994 मध्ये ते दुबईला गेले आणि आखाती देशांमध्ये त्यांचा व्यवसाय वाढवला. दुबईत त्यांनी साखर, तेल, अॅल्युमिनियम, तांबे आणि लोखंडी भंगाराचा व्यवसाय केला. ते या वस्तू उत्पादक देशांकडून विकत घ्यायचे आणि वापरणाऱ्या देशांमध्ये विकायचे.