वर्ल्ड पॉवरच्या दिशेने भारत, अनेक जागतिक संस्थाचे मिळाले अध्यक्षपद

गेली काही वर्षे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,भारत एक जागतिक शक्ती म्हणून पुढे यावा यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगात प्रमुख वैश्विक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. कारण अनेक महत्वाच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनाचे अध्यक्षपद या वर्षात भारत भूषविणार आहे.

जगातील श्रीमंत देशांच्या जी ७ परिषदेत यंदा भारताला पाहुणा म्हणून प्रथमच आमंत्रण दिले गेले होते आणि त्यानंतर आता या संघटनेत भारताला कायमचे सदस्यत्व देण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. असे झाले तर या संघटनेचे नाव जी ८ होईल. गेल्याच वर्षे भारताने ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी बडी अर्थव्यवस्था म्हणून कामगिरी केली आहे. या संघटनेचे सदस्यत्व मिळाले की जागतिक स्तरावर भारताची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. पूर्वी या संघटनेत रशिया होता पण रशियाला नंतर काढून टाकले गेले होते.

शांघाई सहयोग संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून पुढील वर्षी हे संमेलन भारतात होणार आहे. यावेळी भारत दहशतवाद आणि विदेशी फंडिंग या मुद्द्यांवरचे प्रस्ताव मंजूर करून पाकिस्तानच्या नाड्या आवळू शकेल असे सांगितले जात आहे. जागतिक विकसित आणि विकसनशील देशाची संघटना जी २०चे अध्यक्षपद भारताकडे आले असून हे संमेलन पुढील वर्षी भारतात होणार आहे. अमेरिका, रशिया, चीन, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रांस, ऑस्ट्रेलिया,सौदीसह अनेक प्रभावशाली देश यात सामील आहेत. येथे भारत मित्र देशांना पाहुणे म्हणून निमंत्रित करू शकेल आणि त्यामुळे आशिया, आफ्रिका आणि युरोप मध्ये भारताचा प्रभाव आणि विस्तार वाढ होण्यास हातभार लागणार आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद येत्या डिसेंबर मध्ये एक महिन्यासाठी भारताकडे आहे. यात भारत जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णायक भूमिका घेऊ शकणार आहे. या सर्व बाबींमुळे वर्ल्ड पॉवरच्या दिशेने भारताची पावले वेगाने पडत असल्याचे मत अनेक जाणकार तज्ञ व्यक्त करत आहेत.