चीन समुद्रतळाशी उभारतेय ड्रोन तुकडी, उपग्रह फोटोवरून मिळाले संकेत

चीन, दक्षिण चीन समुद्रात मोठ्या प्रमाणावर मानवरहित ड्रोन तैनात करत असल्याचे संकेत मिळाले असून उपग्रहाने नव्याने घेतलेल्या फोटोवरून ही बाब समोर आली आहे. हॅनॉन द्वीप येथील सान्या नेव्हल बेसवर चीनचीदोन मोठी अनक्रूड अंडरवॉटर व्हेइकल्स (मानवरहित ड्रोन) पाहिली गेली असून हा भाग भौगोलिक विवाद असलेला आहे.

एएनआयने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार मार्च एप्रिल २०२१ मध्ये या बेसवर दोन अंडरवॉटर ड्रोन कायमचे तैनात असल्याचे बोलले जात होते पण ही ड्रोन आत्ता फोटोच्या माध्यमातून समोर आली आहेत. ही ड्रोन सध्या अश्या भागात आहेत जेथे चीनने अगोदरच छोट्या पाणबुड्यांचा तळ उभारला आहे. ही ड्रोन टेस्ट किंवा ट्रायल साठी या भागात आणली गेली असावीत अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही ड्रोन १६ मीटर लांब आणि दोन मीटर रुंदीची आहेत. अंडरवॉटर ड्रोन हेरगिरी, गस्त तसेच टोही कामासाठी उपयुक्त ठरतात. या ड्रोनचा आकार मोठा असल्याने ती दीर्घकाळ समुद्रात राहू शकतात. आक्रमक हालचाली, सुरुंग पेरणे, पाणबुड्याविरोधात युध्द अशी खास कामे करण्यास ही ड्रोन सक्षम आहेत. द.चीन समुद्र हे अश्या ड्रोन साठी आदर्श ठिकाण असल्याचे नौसेना तद्न्य सांगतात. या ड्रोनच्या पाण्याखालच्या हालचाली सहज टिपता येत नाहीत आणि उथळ समुद्रात मोठ्या नौसेना जहाजांना नेव्हीगेशन साठी धोकादायक होऊ शकतात असेही सांगितले जात आहे.