गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे भेटीने चर्चेला उधाण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि देशातील सर्वात श्रीमंत आणि बडे उद्योजक गौतम अदानी यांच्या एक तासाच्या भेटीने राज्यात चर्चेला उधाण आले असून या भेटीमागे काय उद्देश असावा याचे विविध अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. बुधवारी अदानी यांनी मुंबईत ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे एक तास या दोघात चर्चा झाली मात्र चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. गौतम अदानी यांनी नुकतेच जागतिक श्रीमंत यादीत दोन नंबरवर असलेल्या जेफ बेजोस यांना मागे टाकून दोन नंबरवर झेप घेतली आहे. अदानी प्रामुख्याने भाजपच्या मर्जीतील उद्योजक मानले जातात.
गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना झाल्याने अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. तसेच वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गुजराथेत गेल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व दिले जात आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षात दुप्पट झाली असून त्यांची रोजची कमाई सरासरी १६१२ कोटी राहिली आहे. त्यांची एकूण संपत्ती १०,९४,४०० कोटी असून गेल्या पाच वर्षात त्यात १४४० टक्के वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.