अवघ्या १९ वर्षी देशातील श्रीमंत यादीत आला कैवल्य वोहरा

मेहनत आणि कामाची तळमळ, कमी वयात मोठे यश मिळवून देऊ शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे झेप्टो या क्विक कॉमर्स कंपनीचा सहसंस्थापक कैवल्य वोहरा. अवघ्या १९ व्या वर्षी कैवल्य १००० कोटी रुपये संपत्तीचा मालक बनला असून देशातील तो श्रीमंत यादीतील पहिला टीन एजर उद्योजक आहे. वेल्थ हरून इंडिया रिच लिस्ट २०२२ मध्ये कैवल्यला प्रथमच जागा मिळाली आहे. या शिवाय फिजिक्सवालाचा सहसंस्थापक अलख पांडे सह अनेक स्टार्टअप संस्थांनी या यादीत प्रथमच स्थान मिळविले आहे.

कैवल्य वोहराने आदित पलीचासह २०२० मध्ये झेप्टोची मुहूर्तमेढ रोवली आणि आज कैवल्य १००० कोटींची मालमत्ता असलेला युवक बनला आहे. गतवर्षात कंपनीचे मुल्यांकन ५० टक्क्यांनी वाढले आणि त्याचा थेट फायदा कैवल्य आणि आदित यांना मिळाला. आदित २० वर्षाचा आहे. त्याचीही मालमत्ता अशीच वाढली आहे. १० वर्षापूर्वी वेल्थ हरून इंडिया रिच यादीत देशातील सर्वात युवा श्रीमंत व्यक्तीचे वय ३७ वर्षे होते.

फिजिक्सवालाच्या अलख पांडेचे वय ३० असून तो आणि प्रतिक महेश्वरी या यादीत प्रथमच सामील झाले आहेत. या दोघांची मालमत्ता ४ हजार कोटींची असून वैयक्तिक मालमत्ता यादीत ते ३९९ व्या स्थानावर आहेत. करोना काळात त्यांनी त्यांची कंपनी स्थापन केली होती. यंदा १ हजार कोटी किंवा त्याहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या २०२२ मध्ये प्रथमच ११०० पेक्षा जास्त आहे. गेल्या पाच वर्षात ही वाढ ६२ टक्के आहे असे नमूद केले गेले आहे.