T20I मध्ये मोहम्मद रिझवानचा झंझावत कायम, मोडला विराट कोहलीचा खास विक्रम


पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात विशेष स्थान मिळवले. मोहम्मद रिझवानने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. यासोबतच रिझवानने जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीचा विक्रमही मोडीत काढला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. रिझवानने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 52 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या बाबतीत रिझवान बाबरच्या बरोबरीने पोहोचला आहे.

विराट कोहलीने आपल्या T20 कारकिर्दीतील 56 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या. मात्र आता बाबरनंतर रिझवानही या प्रकरणात कोहलीच्या पुढे पोहोचला आहे. मंगळवारी केएल राहुलनेही आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण केल्या. राहुलने कारकिर्दीतील 58व्या डावात हे स्थान गाठले आणि सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. अॅरॉन फिंचने कारकिर्दीतील 62 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या.

पाकिस्तानला आहे परतण्याची संधी
बाबर आझमबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याने हे विशेष स्थान मिळवले. आता रिझवानने इंग्लंडविरुद्ध 46 चेंडूत 68 धावांची खेळी करत बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली. रिझवानची खेळी मात्र संघाला कामी आली नाही आणि इंग्लंडने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.

मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे. या मालिकेत इंग्लंड सध्या 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 सप्टेंबर रोजी नॅशनल कराची स्टेडियमवर होणार आहे.