यामुळे महागरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला ठोठावला 3.66 लाखांचा दंड


मुंबई : मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठा धक्का दिला आहे. महानगरपालिकेने दंड ठोठावला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान मंडप तयार करण्यासाठी पदपथावर 53 तर रस्त्यावर 150 खड्डे खोदण्यात आले होते. त्यासाठी हा दंड ठोठावण्यात आल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर 183 खड्डे केल्यामुळे 3.66 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड 2000 रुपये प्रति खड्डा या दराने आकारण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सव 2022 मध्ये रस्त्यावर खड्डे खोदल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळण्याची काय आहे प्रक्रिया
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील गणेशोत्सव मंडळे दरवर्षी मंडप बांधण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी घेतात. त्यानंतरच मंडप उभारणीला परवानगी दिली जाते. अनेक मंडळे मंडप बांधण्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदतात. यासोबतच फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक काढून त्या ठिकाणी खड्डे खोदून मंडपाचे खांब बसवले जातात. गणेशोत्सवानंतर या सर्व बाबींचा महापालिकेकडून आढावा घेतला जातो. त्यानंतर विविध मंडळांनी रस्ते, पदपथ उद्ध्वस्त केले केले असतील, तर त्या मंडळांना दंड ठोठावला जातो.

लालबागमधील अनेक गणेशोत्सव मंडळे प्रसिद्ध आहेत. यापैकी एक म्हणजे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून लाखोंने भाविक येतात. त्यामुळे मंडळाकडून दरवर्षी मोठी व्यवस्था केली जाते. त्यासाठी मोठे मंडप बांधण्यात आले होते. अशावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाकडून अनेक ठिकाणी खड्डे खोदले जातात. गणेशोत्सवानंतर महापालिकेने नियमानुसार खड्डे बुजविण्याची जबाबदारी मंडळावर सोपवली आहे. मात्र, गणेशोत्सवाला अनेक दिवस उलटूनही लालबागचा राजा मंडळाकडून खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. हे खड्डे वेळेवर न भरल्याने महापालिकेने मंडळाला दंड ठोठावला आहे.