काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू झाल्यावरुन ओवेसींनी विचारला प्रश्न – का बंद आहे जामिया मशीद? श्रीनगर पोलिसांनी दिले असे उत्तर


नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील लोकांची परिस्थिती कायमच चांगली राहिलेली नाही. कधी इंटरनेटवर बंदी असते तर कधी कर्फ्यूमुळे लोक त्रस्त असतात. दरम्यान, काश्मीरमध्ये अनेक वर्षांनी चित्रपटगृहे परतली आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुलवामा आणि शोपियानमधील दोन सिनेमा हॉलचे उद्घाटन केले. ज्यावर AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टोमणा मारला आहे. श्रीनगरमधील जामिया मशीद का बंद ठेवण्यात आली आहे, असा सवाल त्यांनी केला. आता ओवेसी यांना श्रीनगर पोलिसांनी उत्तर दिले आहे. ज्यात पोलिसांनी त्यांचा दावा फेटाळून लावला असून जामिया मशीद पूर्णपणे खुली असल्याचे म्हटले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये चित्रपटगृहे सुरू केल्याबद्दल केंद्र सरकारला टोला लगावला होता. ओवेसी यांनी ट्विट करून लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना विचारले होते की, शोपियान आणि पुलवामामध्ये सिनेमा हॉल सुरू झाले आहेत, पण श्रीनगर जामिया मशीद दर शुक्रवारी का बंद केली जाते?


श्रीनगर पोलिसांनी दिले उत्तर
ओवेसींचे हे विधान चांगलेच व्हायरल झाले आणि जम्मू-काश्मीर प्रशासनावरही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर काही वेळातच श्रीनगर पोलिसांनी एक ट्विट केले. ज्यात पोलिसांनी सांगितले की जामिया मशीद पूर्णपणे उघडी आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्यामुळे कोरोनानंतर ती फक्त तीन वेळा तात्पुरते बंद करण्यात आली. या दरम्यान शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्यात आली होती. जामियाच्या अधिकाऱ्यांनी आतील घटनांची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक दशके बंद होती चित्रपटगृहे
1990 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू झाले आहेत. तेव्हा काश्मीरमधील प्रचलित परिस्थितीमुळे सर्व सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. यानंतर प्रयत्न झाले, मात्र दहशतवादी घटनांमुळे सिनेमागृहे सुरू होऊ शकली नाहीत. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सिनेमा हॉल राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटगृहे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराची आक्रमक कारवाई सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे.