वृद्धत्वाकडे चीनची वेगाने वाटचाल

चीनच्या एकूण लोकसंख्येत २०३५ पर्यंत वृद्ध नागरिकांची संख्या ४० कोटींपेक्षा अधिक असेल असे सांगितले जात असून त्यामुळे देशापुढे अनेक आव्हाने उभी राहणार आहेत तसेच सरकारला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाच्या लोकसंख्या व आरोग्य विभाग प्रमुख वांग हँडोंग यांनी  मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार चीन मध्ये गेल्या पाच वर्षात जन्मदर वाढलेला नाही मात्र वृद्धांची संख्या वाढती आहे. गेल्या वर्षाखेर ६० किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांची संख्या २६.७ कोटी आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १८.९ टक्के आहे.

चायना डेलीच्या बातमीनुसार २०२५ मध्ये ६० किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांची संख्या ३० कोटींहून अधिक होईल तर २०३५ पर्यत ती ४० कोटी पेक्षा अधिक होणार आहे. यामुळे सार्वजनिक सेवा, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षेपुढे मोठे आव्हान उभे राहील. गेल्या वर्षात लोकसंखेतील वाढ ५ लाखापेक्षा कमी असून चीनची सध्याची लोकसंख्या १ अब्ज ४१ कोटी आहे. जन्मदर सलग पाचव्या वर्षी घटलेला आहे. आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे.

२०२१ च्या वर्षात चीन मध्ये फक्त ८० लाख विवाह नोंदण्या झाल्या असून १९८६ नंतर हे प्रमाण सर्वात कमी आहे. जन्मदर घट हा चिंतेचा विषय बनला आहे आणि तीन मुले होण्यास सरकारने परवानगी देऊन आणि त्यासाठी प्रोत्साहन योजना राबवून सुद्धा त्याचा म्हणावा तसा योग्य परिणाम झालेला नाही. उशिरा विवाह ही चीन मध्ये आता पद्धतच पडून गेल्याचे सांगितले जात आहे.