नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असून मंगळवारी दक्षिण पश्चिम राजस्थान तसेच गुजराथच्या कच्छ विभागातून पावसाने माघार घेतली आहे. यंदा देशात चांगला पाऊस झाला असला तरी तांदूळ उत्पादक आठ राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर मध्ये यंदा कमी पाउस झाला आहे.

२०१६ नंतर प्रथमच सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. १७ सप्टेंबर पासून मान्सून माघारी फिरल्याचे जाहीर केले गेले आहे. मान्सून परतीची घोषणा पाच दिवस पाउस नसणे, त्या विभागात प्रतीचक्रवात स्थिती असणे आणि कोरडी हवा यावरून केली जाते. यंदा देशात ७ टक्के पाऊसमान अधिक आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस १ जूनला भारतात दाखल होतो आणि ३० सप्टेंबर पर्यंत राहतो असा कालावधी आहे. यंदा १ जून ते २० सप्टेंबर या कालावधीत ८७८.५ मिमी पाउस झाला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणखी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.