बेबो झाली ४२ वर्षांची

बॉलीवूडमधील आघाडीची नायिका करीना कपूर उर्फ बेबो हिने २१ सप्टेंबर रोजी वयाची ४२ वर्षे पूर्ण केली आहेत. वादग्रस्त वक्तव्ये, विवाह, मुलांची नावे यावरून नेहमीच चर्चेत राहिलेल्या करीनाला जन्मापासूनच चित्रपटाचा वारसा मिळाला असला तरी तिचा बॉलीवूड प्रवास म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. तिची आई बबिता प्रेग्नन्सी मध्ये वाचत असलेल्या अॅन करेनीनाच्या कथेवरून करीना हे नाव तिला मिळाले असे सांगतात.

लहानपणापासून खोडकर असलेल्या करीनाला प्रथमपासून अभिनेत्रीच बनायचे होते. प्रथम करीना, राकेश रोशन यांच्या कहो ना प्यार है मधून डेब्यू करणार होती पण वैयक्तिक कारणाने तिने हा चित्रपट सोडला आणि रेफ्युजी मधून ती प्रथम पडद्यावर झळकली. तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले आणि तिला ‘फिल्म फेअर फॉर बेस्ट डेब्यू’ चे अॅवॉर्ड मिळाले. पण तिच्या करियर मध्ये अशीही एक वेळ होती जेव्हा करीनाचे लागोपाठ सहा चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यात तलाश, एलओसी असे बडे चित्रपट सुद्धा होते. पण तरीही तिच्या अनेक भूमिका अश्याही होत्या ज्या प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत.

२०१२ मध्ये सैफ अली खान बरोबर तिने केलेला विवाह जोरदार गाजला आणि त्यावर टीकाही झाली. त्यानंतर मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरून सुद्धा तिला टीकेला सामोरे जावे लागले. पण तिची करीयर मधली घोडदौड थांबली नाही. आज करीना ४४० कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. एका चित्रपटासाठी ती ७ ते १० कोटी रुपये घेते आणि ब्रांड प्रमोशन मधून सुद्धा मोठी कमाई करते. तिच्या वाहन ताफ्यात मर्सिडीज, ऑडी क्यू ७, रेंज रोव्हर, लेक्सर अश्या अनेक महागड्या कार्स आहेत.