भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताचे महत्त्वाचे खेळाडू या मालिकेतून बाहेर राहू शकतात. एवढेच नाही तर पुन्हा एकदा शिखर धवनला वनडे संघाची कमान मिळू शकते. यासोबतच विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय खेळाडूंना लवकरच ऑस्ट्रेलियात पाठवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
IND Vs SA : वनडे मालिकेत शिखर धवन होणार कर्णधार, या खेळाडूंना मिळणार संधी
एकदिवसीय सामन्यांपूर्वी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत तीन टी-20 सामनेही खेळायचे आहेत. 28 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून शेवटचा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंना 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार करत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंना तयारीची पूर्ण संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बीसीसीआयने या संदर्भात संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केली आहे. जर खेळाडू 5 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियात पोहोचले, तर त्यांना सरावासाठी अतिरिक्त आठवडा मिळेल. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. याशिवाय टीम इंडियाला दोन सराव सामनेही खेळायचे आहेत.
या खेळाडूंना मिळणार संधी
वनडे मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे. शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतही संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. या मालिकेत अशा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते ज्यांचे T20 विश्वचषक संघात स्थान हुकले आहे. शुभमन गिल फक्त ओपनरच्या भूमिकेत दिसणार आहे.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, इशान किशन, आवेश खान, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही संधी दिली जाऊ शकते. मात्र, विश्वचषकासाठी राखीव ठेवण्यात आलेले खेळाडू संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे.