रशिया मैत्रीमुळे भारताची ३५ हजार कोटींची बचत

भारताने पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धामुळे रशियावर घातलेल्या प्रतिबंधाला न जुमानता रशियाशी असलेले संबंध कायम ठेवल्यामुळे भारताची ३५ हजार कोटींची बचत झाल्याचे समोर आले आहे. नुकत्याच उझबेकिस्तान मध्ये पार पडलेल्या शांघाई सहयोग संघटन बैठकीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि मोदींच्या पुतीन यांना ‘सध्याची वेळ युद्धाची नाही’ या सल्ल्याचे जगभरात कौतुक सुद्धा झाले. मात्र युक्रेन युद्धामुळे रशियावर घातलेल्या प्रतिबंधाना न जुमानता आणि टीकेची झोड उठूनही भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात केले होते त्यातून ही बचत झाली आहे. पाश्चिमात्य देशांनी विरोध करूनही भारताने तेल आयातीचा निर्णय बदलला नाही त्यामुळे झालेल्या नफा नुकसानीची चर्चा होत असताना ही माहिती समोर आली आहे.

रॉयटरच्या रिपोर्ट नुसार भारताने यावर्षी पहिल्या तिमाहीत रशियाकडून ६.६ लाख टन कच्चे तेल आयात केले तर दुसऱ्या तिमाहीत हाच आकडा वाढून ८४.२ लाख टनांवर गेला. रशियाने भारताला प्रती बॅरल ३० डॉलर्स डिस्काऊंट दिला होता त्यातून भारताचे ३५ हजार कोटी रुपये वाचले असे समोर आले आहे. २०२२ मध्ये भारतात स्वस्त तेल आयात १० टक्के वाढली. जुलै मध्ये रशिया भारतासाठी दोन नंबरचा तेल पुरवठादार देश होता आणि सौदी तीन नंबरवर गेला होता. पण सौदीने पुन्हा पुरवठा वाढविला आहे.

भारतासाठी तेल दर हे महत्वाचे ठरतात कारण या आयातीतून देशाच्या एकूण मागणीपैकी ८३ टक्के गरज पूर्ण होत असते. भारत आयात तेलावर मोठा खर्च करतो.