केरळच्या लोकप्रिय लॉटरी विषयी सर्व काही

केरळ मध्ये वार्षिक बम्पर लॉटरी मध्ये रिक्षाचालक अनुप याला २५ कोटींचा जॅकपॉट लागल्याने पुन्हा एकदा केरळ लॉटरी चर्चेत आली आहे. केरळ मध्ये गेली ५५ वर्षे सरकारकडून लॉटरी चालविली जात असून त्यासाठी अतिशय सुनियोजित व्यवस्थापन केले गेले आहे. यातून केरळ सरकारला मोठा महसूल मिळतोच पण लॉटरी विभागासाठी वेगळा स्टाफ नेमला गेला आहे. देशातील अनेक राज्यात लॉटरी ला बंदी असताना केरळ मध्ये लॉटरी इतकी लोकप्रिय कशी असा प्रश्न नेहमी विचारला जातो.

१९६७ मध्ये प्रथम, केरळचे तत्कालीन अर्थमंत्री पी के कुंजू यांनी सरकारी लॉटरी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून आजतागायत ही सरकारी लॉटरी सुरुच आहे. त्यातून राज्याला मोठा महसूल मिळतो आणि त्याचा वापर गरिबांसाठी स्वास्थ्य योजना राबविण्यासाठी केला जातो. सध्या राज्याला मिळत असलेल्या एकूण कर महसुलात लॉटरीचा हिस्सा ८१.३२ टक्के आहे. रिक्षावाला अनुप जिंकला ती सर्वात मोठी वार्षिक लॉटरी असून त्याच्या तिकीटाची किंमत ५०० रुपये आहे. या वर्षी केरळात लॉटरीची ६६.५ लाख तिकिटे खपली. गतवर्षी हाच आकडा ५४ लाख होता. या लॉटरी तिकिटावर विक्री एजंटला २५ टक्के कमिशन दिले जाते.

केरळ सरकारच्या अनेक लॉटरी आहेत. दर आठवड्याची साप्ताहिक लॉटरी, ७ विकली लॉटरी असून त्याच्या बक्षिसाची रक्कम ७५ लाख ते १ कोटी रुपये असते आणि तिकीटाची किमंत १० रूपये असते. वर्षाला सहा बम्पर लॉटरी असतात त्याच्या बक्षिसाची रक्कम ६ कोटी ते २५ कोटी पर्यंत असते. ही तिकिटे १०० ते ५०० रुपये दरम्यान असतात. यातून मिळणारा महसूल कल्याणकारी योजनासाठी वापरला जातो. जीएसटी मधून जे पैसे मिळतात, त्याचा वापर अनाथ वरिष्ठ नागरिकांसाठी, गरीब रुग्ण उपचारासाठी, गंभीर आजारावरील खर्च करण्यासाठी होतो. लॉटरी बक्षिसे मिळाल्याने लाखो नागरिक गरिबी रेषेच्या वर येतात.

देशात १३ राज्यात लॉटरी आहे. लॉटरी राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र अनेक राज्यात लॉटरीला जुगार मानले जाते त्यामुळे त्यावर बंदी आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशात लॉटरीवर बंदी आहे. देशात एकही अधिकृत ऑनलाईन लॉटरी नाही. आसाम, अरुणाचल, गोवा, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, नागलँड, मिझोरम, पंजाब, प.बंगाल या राज्याच्या लॉटरी आहेत. तेथील तिकिटांची किंमत १ रुपयापासून ५०० रुपये आहे. केरळ मध्ये रोज लॉटरीची ९० लाख तिकिटे विकली जातात असे आकडेवारी वरून दिसून येते.