महिला बॉस संख्या भारतात दुपटीने वाढली

ग्रांट थॉरटन आंतरराष्ट्रीय बिझिनेस रिपोर्ट २०२२ च्या नव्या आकडेवारी नुसार २९ देशात १० हजार कंपन्यात केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणात जगभरात महिला बॉसची संख्या २०१७ च्या २५ टक्क्यांच्या तुलनेत २०२२ मध्ये ३२ टक्के वाढली आहे. तर भारतात हेच प्रमाण आणखी उत्तम आहे. भारतात २०१७ ते २०२२ या काळात कंपनीत बॉसच्या खुर्चीत विराजमान झालेल्या महिलांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. २०१७ मध्ये हा आकडा १७ टक्के होता तो २०२२ मध्ये ३८ टक्क्यांवर गेला आहे.

भारतात सर्वाधिक लेडी बॉस शिक्षण क्षेत्रात असून हा आकडा ३० टक्के आहे तर रियल इस्टेट व्यवसायात हाच आकडा १४ टक्के आहे. भारतात सर्वाधिक ३९ टक्के महिला शिक्षण क्षेत्रात वरिष्ठ पदावर आहेत तर वेलनेस,फिटनेस क्षेत्रात ३३ टक्के महिला वरिष्ठ पदावर आहेत. रिअल इस्टेट मध्ये २१ टक्के महिला वरिष्ठपदी आहेत. भारतात हे सर्व्हेक्षण २५० कंपन्यांमध्ये केले गेले आहे. करोना काळानंतरचे वर्क कल्चर महिलांना फायद्याचे ठरल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

करोना काळात वर्क फ्रॉम होम, कामाच्या तासातील लवचिकता यामुळे महिलांनी आघाडी घेतली असून गेल्या ५ वर्षात कंपन्यात वरिष्ठपदी गेलेल्या महिलांची संख्या ३५ टक्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय उभारणीत आणि रोजगार देण्यात सुद्धा भारतीय महिला पुढे आहेत. इंडिया ब्रांड इक्विटी फौंडेशन रिपोर्ट नुसार देशातील ४५ टक्के स्टार्टअपच्या मालक महिला आहेत आणि मध्यम लघु उद्योग क्षेत्रात सुद्धा महिलांचे प्रमाण २० टक्के आहे. देशात ४३.२ कोटी महिला वर्किंग वूमन आहेत आणि १.३५ कोटी ते १.५७ कोटी उद्योग महिलांच्या मालकीचे आहेत. त्यातून त्यांनी २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार दिला आहे. २०३० पर्यंत महिला स्थापित उद्योग ३ कोटींवर जातील आणि त्यातून १५ ते १७ कोटी रोजगार निर्माण होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.