दिल्ली जयपूर हायवेवर भूतप्रेतांचा वावर?
देशात वेगाने हायवे बनविण्याचे काम सुरु आहे आणि त्यामुळे उद्योग व्यवसायांचा वेगाने विकास होण्यास मदत होते आहे त्याचप्रमाणे प्रवासाचा वेळ कमी झाल्याने इंधनबचत होते आहे. पण देशातील काही हायवे मात्र बदनाम ठरले आहेत. त्यातील एक म्हणजे जयपूर दिल्ली हायवे. देशातील सर्वात भीतीदायक हायवे मध्ये या रस्त्याचा नंबर वरचा आहे. हा सुनसान हायवे झपाटलेला म्हणजे भूतप्रेतांचा वावर असलेला असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळात या रस्त्याने यायची वेळ आलीच तर सावधगिरी हवी असा सल्ला दिला जातो.
आपण अनेक हॉरर चित्रपट किंवा मालिकातून असे गूढ, रहस्यमयी रस्ते पाहतो, जेथे गडद अंधारात रस्त्यात अचानक कुणी एकटा माणूस अथवा पांढरी साडी नेसलेली महिला हमखास असते. दिल्ली जयपूर हायवेबाबत अश्या अनेक कथा ऐकायला मिळतात. जयपूर जवळच्या भानगढ या रहस्यमयी आणि झपाटलेल्या किल्ल्याच्या जवळून हा हायवे जातो त्यामुळे अश्या अनेक कथा जश्या ऐकायला मिळतात तसेच अनेक प्रवासी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सुद्धा शेअर करतात. येथे अनेकांना रात्री प्रवास करत असताना आपल्या वाहनाच्या बरोबर कुणी धावते आहे, कुणी तरी ढकलते आहे, कुणी गाडी पुढे जाऊ देत नाही असे अनुभव येतात.
रात्री अनेकदा या रस्त्यांवर विचित्र आवाज येतात, रस्त्यात मधोमध कुणी तरी उभे राहिल्याचे दिसते तर अनेकांना नकारात्मक उर्जा अचानक वाढल्याचे जाणीव होते. अनेकांना रस्त्याकडेला अंधारात उभी असलेली एकटी महिला दिसते. अनेकदा या रत्यावर गाड्या बिघडतात. आपल्यावर कुणी तरी नजर ठेऊन आहे असे भास होतात आणि या रस्त्यावर अपघात खूप होतात. जेव्हा पासून हा हायवे तयार झाला आहे तेव्हापासून दर दिवशी येथे अपघात वाढत चालले आहेत. अनेकदा अति वेग हेही अपघातामागचे कारण असते.
गुरुग्रामच्या खेर्की टोलपासून सुरु होणारा हा हायवे जयपूरच्या चंदवाजी येथे संपतो. १९५. १ किमी लांबीचा हा हायवे आठ पदरी आहे. मनेसर, पटौडी, बावळ, मंगळचौधरी, बह्रोड, शाहपुर, चोमू असा हा रस्ता हरियाना आणि राजस्तानच्या सात जिल्यातील ४२३ गावांमधून जातो. ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे असे त्याचे नाव आहे. या रस्त्याने रात्रीचा प्रवास धोकादायक ठरतो असा अनेकांचा अनुभव आहे.