कुनो अभयारण्यातील ‘बकरा’ म्हणून आलाय चर्चेत

देशातून ७० वर्षांपूर्वी चित्ते नष्ट झाल्यानंतर मध्यप्रदेशाच्या शोपूर जिल्यातील कुनो अभयारण्यात नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोडले गेले आणि तेव्हापासून हे चित्ते चर्चेत आहेत. त्याचबरोबर या भागात तरसाचे सावज म्हणून सोडला गेलेला एक बकरा सुद्धा चित्त्यांच्या इतकाच चर्चेत आला आहे. या बकऱ्याचे आयुष्य कधी संपणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हकीकत अशी कि कुनो येथे तयार केलेल्या कुंपणात चित्ते सोडण्यापूर्वी या भागातील तरस (वाघ, बिबट्या सारखाच एक शिकारी प्राणी) पकडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे प्रयत्न होते. त्यासाठी तरसाना पकडण्यासाठी येथे एक बकरा बळी म्हणून रोज सोडला जात होता. या बकऱ्याची शिकार करण्यासाठी तरस आले कि पकडायचे असा उद्देश होता. पण गेले काही दिवस रोज या बकर्याचे सावज लावूनही कुठल्याच तरसाने त्याची शिकार केली नाही. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण या बकऱ्याच्या बाबतीत खरी ठरली.

वास्तविक या जंगलातील तरसे गावात शिरून माणसांची शिकार करत होते पण जंगलात सोडलेल्या या बकऱ्याकडे मात्र एकही तरसाने ढुंकून पाहिले नाही. अजूनही हा बकरा याच भागात आहे. आता येथे चित्ते दाखल झाले आहेत. या भागातील पाच तरसाना पकडून दुसरीकडे सोडले गेले आहे. नामिबियातील चित्त्याच्या तावडीतून हा बकरा वाचणार का याची आता उत्सुकता लागली आहे.