महाराष्ट्र एटीएसने पकडला 15 लाखांचे बक्षीस असलेला माओवादी, झारखंड सरकार बरेच दिवस होते शोधत


मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी पहाटे नालासोपारा येथील एका चाळीवर छापा टाकला आणि कथित माओवादी असलेल्या 45 वर्षीय वॉन्टेड व्यक्तीला ताब्यात घेतले. 15 लाखांचे बक्षीस असलेला हा आरोपी झारखंडमधून उपचारासाठी महाराष्ट्रात आला होता. झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) चा प्रादेशिक समिती सदस्य कारू हुलास यादव हा नालासोपाऱ्यातील धनवी, रामनगर चाळीत सापडला. एटीएसने त्याला चौकशीसाठी ठाणे युनिटमध्ये नेले. झारखंड पोलिसांनी यादवच्या मुंबई किंवा आसपासच्या परिसरात असल्याची माहिती दिली होती. एटीएसने आठवडाभर या माहितीवर काम केले.

दोन महिने नालासोपाऱ्यात होता माओवादी
पोलिसांनी सांगितले की, यादव हा मूळचा झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गावचा असून तो 2004 पासून सीपीआय (माओवादी) मध्ये सक्रिय आहे. एटीएसने या कारवाईची माहिती झारखंड पोलिसांना दिली आहे. यादवला ताब्यात घेण्यासाठी झारखंड पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. चौकशीत यादवने पोलिसांना सांगितले की, डोंगर ओलांडताना आपला पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तो नालासोपारा येथे आला होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचा एक नातेवाईक नालासोपारा येथे राहतो.

फडणवीस यांनी केले महाराष्ट्र एटीएसचे कौतुक
झारखंड सरकारने यादव आणि इतरांना पकडण्यासाठी 15 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यावरील बक्षीस पहिल्यांदा 10 वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. यादवचा दोन डझनहून अधिक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माओवाद्याला पकडल्याबद्दल एटीएसचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले आहे की, मी ATS महाराष्ट्र टीमचे एका यशस्वी सकाळच्या ऑपरेशनसाठी अभिनंदन करतो, ज्यामध्ये शीर्ष नक्षलवादी नेता कारू यादवला नालासोपारा येथून अटक करण्यात आली होती, ज्यावर 15 लाखांचे बक्षीस होते.