फसवणूक प्रकरणी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने न्यायालयात केले आत्मसमर्पण


प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना आणि अभिनेत्री सपना चौधरीने सोमवारी लखनऊ येथील एसीजेएम न्यायालयात आत्मसमर्पण केले. एका फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यानंतर ती आज न्यायालयात पोहोचली. मात्र, शरणागती पत्करल्यानंतर काही वेळातच न्यायालयाने सपना चौधरीचे वॉरंट मागे घेतले. न्यायालयाने तिची कोठडीतून सुटका केली. न्यायालयाच्या सुनावणीत हजर राहून सहकार्य करेल या अटीवर न्यायालयाने सपना चौधरीचे वॉरंट रद्द केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सपना चौधरीवर आरोप आहे की तिने डान्स शोसाठी पैसे घेतले, पण ती शोमध्ये पोहोचली नाही. या प्रकरणी निर्मात्यांनी सपनाविरुद्ध आशियाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. हे संपूर्ण प्रकरण 13 ऑक्टोबर 2018 चे आहे. त्यानंतर आशियानाच्या एका खासगी क्लबमध्ये सपना चौधरीचा शो आयोजित करण्यात आला होता. शोची तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली.

सपना दुपारी तीन वाजता कार्यक्रमाला येणार होती आणि रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार होता. सपना चौधरीच्या शोचे आयोजन जुनैद अहमद, नवीन शर्मा, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय आणि पहल इन्स्टिट्यूटचे इवाद अली यांनी केले होते. मात्र ती या शोपर्यंत पोहोचली नाही. तिला पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांना याचा राग आला आणि त्यांनी एकच गोंधळ घातला.

तसेच तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थितांनी आयोजकांवर फसवणुकीचा आरोप करत जोरदार तोडफोड केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजावून लोकांना शांत केले. त्यानंतर आयोजकांनी गुन्हा दाखल केला.