मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जेथे सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी 9 वर्षांत 62 जणांचा झाला मृत्यू


मुंबई : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सायरस मिस्त्री गुजरातमधून मर्सिडीजमधून महाराष्ट्रात परतत होते. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. सायरस यांची कार एका ट्रकला ओव्हरटेक करत कार डिव्हायडरला इतक्या वेगाने धडकली की सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या तपासादरम्यान असे समोर आले आहे की, सायरस मिस्त्री यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण असे आहे की, जिथे दररोज अपघात होतात. या 100 किमी परिघात एका वर्षात 262 रस्ते अपघात झाले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाण्यातील घोडबंदर आणि पालघर जिल्ह्यातील दापचरी दरम्यान 100 किलोमीटरचा पल्ला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या या 100 किमी लांबीच्या भागात या वर्षात 262 अपघात झाले आहेत, ज्यामध्ये 62 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 192 लोक जखमी झाले आहेत. त्यातील असे काहीजण आहेत जे जिवंत तर आहेत, पण त्यांच्यात जीव नाही.

देखभालीचा अभाव
या ठिकाणी झालेल्या अपघातांपैकी बहुतांश अपघात हे वाहनचालकाच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यांची खराब देखभाल, योग्य चिन्हे नसणे आणि वेगाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना याही अनेक अपघातांना कारणीभूत आहेत.

अनेक अपघात
महाराष्ट्र महामार्ग पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चारोटीजवळील महामार्गावर मिस्त्री यांच्या कारला 4 सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून या भागात झालेल्या गंभीर अपघातांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, चिंचोटीजवळील परिसरात याच कालावधीत झालेल्या गंभीर अपघातांत 25 जणांचा मृत्यू झाला असून, मनोरजवळील अपघातांमध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

असा आहे रस्ता
या अधिकाऱ्याने सांगितले की, चिरोटी आणि मुंबईकडे जाणारा सुमारे 500 मीटरचा रस्ता अपघातांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. ते म्हणाले की, मुंबईकडे जाताना सूर्या नदीवरील पुलाच्या आधी रस्ता वळतो आणि तीन पदरी रस्त्याचे दुतर्फा वळण होते, मात्र याबाबत वाहनचालकांना अगोदर माहिती देण्यासाठी रस्त्यावर योग्य फलक नाहीत.

निर्देशकांची कमतरता
पालघरमधील सूर्या नदीवरील पुलाच्या दुभाजकावर कार आदळून मिस्त्री (54) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. कार चालवत असलेले अनाहिता पांडोळे (55) आणि त्यांचे पती डेरियस (60) हे गंभीर जखमी झाले. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंडियन रोड काँग्रेसच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांकडे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.

टोल आकारतात पण देखभाल करत नाहीत
अधिकाऱ्याने सांगितले की हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत येतो, परंतु देखभालीची जबाबदारी खाजगी टोल वसूल करणाऱ्या एजन्सीची आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक 30 किमीवर एक रुग्णवाहिका सज्ज ठेवली पाहिजे आणि एक क्रेन आणि गस्ती वाहने देखील असावीत.

महाराष्ट्र पोलिसांनी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटला पत्र लिहून रस्ता सुरक्षा ऑडिट करण्यास सांगितले आहे, 4 सप्टेंबरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या सुरक्षा उपायांबद्दल तज्ञांचे मत मागवले आहे.