गुजराथ मध्ये बनतेय देशातील पहिले व्हर्टीपोर्ट, एअर टॅक्सी, ड्रोनसाठी उपयुक्त

उद्योग आणि कृषी क्षेत्रात क्रांती करणारे गुजराथ आता आणखी एका क्रांतीचे साक्षीदार बनते आहे. ही क्रांती उड्डाण क्षेत्रात होत आहे. राज्यात एअर टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी अहमदाबादच्या हन्सोल मध्ये व्हर्टीपोर्ट उभारणीचे काम सुरु झाले असून भारतातील हे पहिलेच व्हर्टीपोर्ट आहे.

व्हर्टीपोर्ट म्हणजे व्हर्टीकल टेकऑफ आणि लँडिंग करता येणारी जागा. छोट्या ड्रोन पासून हेलिकॉप्टर पर्यंत त्याचा वापर करता येतो. एअर टॅक्सी सेवेमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होते, कमी वेळात प्रवास होतो त्याचबरोबर वैद्यकीय आणीबाणी, मानवी अवयव वाहतूक, उपकरणे कमी वेळात आवश्यक ठिकाणी पोहोचविता येतात. गुजराथ मधील व्हर्टीपोर्ट अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण बनविले जात आहे. येथे चार्जिंग बे असतील, जेथे ड्रोन जागेवरच चार्ज करता येतील. शिवाय हँगर्स, सामान लोड अनलोड करणाची आधुनिक सुविधा असेल.

ड्रोन साठी शहरात अनेक जागी इमारतीचे छत, मोकळ्या जागा, मैदाने, एअरपोर्टवर उतरण्याच्या सुविधा दिल्या जात आहेत. गुजराथ स्टेट एविएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडने त्यासाठीची योजना तयार केली आहे.

अश्या सेवा ही भविष्याची गरज असून गुजराथच्या व्हर्टीपोर्टचे काम वेगाने सुरु झाले आहे. जगातील पहिले इलेक्ट्रिकल व्हर्टीपोर्ट, युके मध्ये अर्बनएअर कंपनीने सुरु केले असून देशाच्या कुठल्याही भागात चार तासात त्यामुळे पोहोचता येणार आहे. हे पोर्ट २०२४ पासून सुरु होत आहे. अमेरिकेत तसेच ऑस्ट्रेलियात सुद्धा अनेक ठिकाणी व्हर्टीपोर्ट विकसित करायचे काम सुरु असल्याचे समजते.