सिआचीन ग्लेशिअरवर इंटरनेट सेवा सुरु
भारतीय सेनेच्या फायर अँड फ्युरी कोअरने सिआचीन ग्लेशियरवर १८ सप्टेंबर रोजी सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा सुरु केली आहे. १९०६१ फुट उंचीवर अतिशय दुर्गम आणि खडतर उंच पहाडांवर असलेल्या या भागात आता त्यामुळे इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
सिआचीन हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे युद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते. काश्मीरच्या उत्तरेकडे ६७०० मीटर उंचीवर असलेल्या हा अतिशय खडतर भाग असून येथे पूर्ण वर्षभर ० ते उणे २० डिग्री तर हिवाळ्यात उणे ५० डिग्री तापमान असते. येथे दळणवळण सुविधा नव्हती त्यामुळे सेनेच्या जवानांना कोणताही महत्वाचा संदेश पाठविण्यात अनेक अडचणी येत असत. आता इंटरनेट सेवा सुरु झाल्यामुळे गुप्त माहिती सुद्धा त्वरित संबंधित विभागांना कळविणे शक्य होणार आहे.
भारत पाक सीमेवरचे हे ७८ किमीचे क्षेत्र असून येथे एका बाजुला पाकिस्तान तर दुसरीकडे अक्साई चीन आहे. १९८४ मध्ये पाकिस्तान या भागावर कब्जा करणार असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून म्हणजे १३ एप्रिल ८४ पासून भारतीय लष्कराची फायर अँड फ्युरी तुकडी येथे तैनात आहे.