राणीच्या निधनामुळे बदलणार अनेक प्रतीके

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज शाही इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. राणीच्या निधनामुळे अनेक शाही प्रतीके आता बदलली जाणार आहेत. झेंडे, नोटा, नाणी यावर असलेल्या महाराणीच्या प्रतिमेच्या जागी आता नवा राजा प्रिन्स चार्ल्स थर्ड यांच्या प्रतिमा लावल्या जातील असे सांगितले जात आहे. मात्र किंग चार्ल्स यांनी निर्णय घेतला तर नोटा, नाण्यांवर आहे त्याच प्रतिमा कायम राहू शकतील असेही म्हटले जात आहे.

ब्रिटन आणि राणीची सत्ता असलेल्या जगातील सुमारे १५ हून अधिक देशात रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवर एलिझाबेथ राणीच्या प्रतिमा होत्या. आता या सर्व प्रतिमा बदलायच्या तर त्यासाठी किमान दोन वर्षे लागतील असे सांगितले जात आहे. राणीच्या प्रतिमा असलेल्या सुमारे ४.५ अब्ज नोटांवर नवीन राजाची प्रतिमा लावावी लागेल. विशेष म्हणजे राणी सत्तेवर आली तेव्हा म्हणजे १९५२ मध्ये नोटांवर राणीची प्रतिमा नव्हती. १९६० मध्ये प्रथम रोबर्ट ऑस्टीन यांनी राणीची प्रतिमा नोटेवर आणली. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.

एलीझाभेथ राणीच्या प्रतिमा ब्रिटीश पौंडच्या नाण्याशिवाय आणखी १० देशातील चलनावर आहेत. कॅनडाच्या नोटेवर सुद्धा राणीची प्रतिमा आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी नोटेवर राणीची प्रतिमा आहे. हळू हळू या देशांच्या नोटांही बदलल्या जातील असे समजते. ब्रिटनच्या राष्ट्रगीतात महाराणीच्या उल्लेख असून तिला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना आहे. आता त्यातही बदल केला जाईल. चर्चच्या प्रार्थनेत सुद्धा राणी साठी प्रेअर आहे, त्याऐवजी आता किंग चार्ल्स साठी प्रेअर असतील. त्यासाठी चर्च मधील पुस्तके बदलावी लागतील.

१९५२ पासून संसदेच्या शपथविधी मध्ये राणीचा उल्लेख केला जात असून शपथ घेताना राणी आणि तिच्या वारसदारांशी इमानदार राहू असे म्हणावे लागत असे. आता या शपथेत सुद्धा बदल केला जाणार आहे.