नामिबियन मादा चित्त्याला मोदींनी दिले नवे नाव, ‘आशा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी कुनो अभयारण्यात सोडल्या गेलेल्या चार वर्षीय मादा चित्त्याचे बारसे केले असून तिला ‘आशा’ असे नाव दिले गेले आहे. हे नाव देण्यामागचे कारण असे आहे की, ही मादा लवकरच वयात येणार असून प्रजननक्षम होणार आहे. तिच्या वंशाची वृद्धी होऊ शकणार आहे .नामिबियातून आणल्या गेलेल्या आठ चित्त्यांना कुनो अभयारण्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवे घर दिले गेले असून या नव्या जागेत चित्ते कसे रुळतात यावर बारीक लक्ष ठेवले गेले आहे. त्यासाठी नामिबियातून आलेले तज्ञांचे पथक काम करत आहे. चित्त्यांचा भारतातील पहिला दिवस शांततेत गेला असे समजते.

दोन दिवसांच्या उपासानंतर भारतात आल्यावर या चित्त्यांना रेड्याचे मांस दिले गेले. ते खाल्ल्यावर सर्व चित्ते शांत झोपी गेले. नामिबियातील चित्ता संरक्षण समितीने मोदींना वाढदिवस भेट म्हणून या मादा चित्त्याचे नामकरण करण्याची संधी राखून ठेवली होती. सर्वात मोठ्या मादा चित्त्याचे नाव साशा असून दोन वर्षे वयाच्या मादा चित्त्याचे नाव सिचाया तर अडीच वर्षच्या मादाचे नाव बिल्सी आहे. आणखी एका मादा चित्त्याचे नाव सवाना असे आहे.

चित्त्याच्या अधिवासासाठी या परिसरातील २५ गावातील ग्रामीण आणि ५ तरसे यांना स्थानांतर करावे लागले असून त्याचे दुसरीकडे स्थलांतर केले गेले आहे. नामिबियातून आलेल्या टीमच्या मते या चित्त्याना या जागी रुळण्यासाठी काही वेळ जावा लागेल. ते एकदा का या परिसराशी परिचित झाले कि मग त्यांना अभयारण्यात सोडले जाणार आहे. सध्या हे सर्व चित्ते वेगवेगळ्या कुंपणात ठेवले गेले आहेत.सर्वसामान्य नागरिकांना २ ऑक्टोबर पासून हे चित्ते पाहता येणार आहेत.