जपान मध्ये उडत्या बाईकची विक्री सुरु

जपानच्या एर्विन टेक्नोलॉजीज कंपनीने उडणारी बाईक बाजारात आणली असून ही बाईक ताशी १०० किमी वेगाने उडू शकते. १५ सप्टेंबर रोजी डेट्रोईट ऑटो शो मध्ये ही बाईक सादर करण्यात आली. तिची विक्री सुरु झाली आहे. वहातुक कोंडीतून सुटका करणारी ही बाईक एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा एक पर्याय ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि जलद गतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचता येणार आहे. उडती बाईक बनविणारी एर्विन ही स्टार्टअप कंपनी आहे.

या बाईकचे नामकरण एक्सटुरिझ्मो (x-turismo) असे केले गेले आहे. डेट्रोईट शोचे सह अध्यक्ष थाड झ्रोट यांनी ही बाईक स्वतः चालवून पाहिली आणि उड्डाणाचा हा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या मते ही बाईक चालविणे फारच मस्त आणि उत्साहवर्धक आहे. यामुळे अनेक लोकांचे उडत्या बाईकचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. पण सध्या या बाईकची किंमत जास्त म्हणजे ७,७७००० डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात ६ कोटी १८ लाख रुपये आहे.

या बाईकचे वजन ३०० किलो असून बाईकला उड्डाणासाठीची उर्जा बॅटरीच्या माध्यमातून मिळते. याचे छोटे मॉडेल साधारण ४० लाख रुपयांपर्यत मिळू शकेल असे सांगितले जात आहे. सध्या ही बाईक काळा, निळा आणि लाल रंगात उपलब्ध आहे. २०२३ मध्ये या बाईकची विक्री अमेरिकेत सुरु होणार आहे. सध्या ही बाईक फक्त जपान मध्ये मिळते आहे.